Breaking News
मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकापर्ण ; प्रवेश महागला
नवी मुंबई ः नवी मुंबईतील आकर्षण केंद्र असणारे वंडर पार्कची दुरुस्ती करुन नव्या रुपात सज्ज झालेल्या या पार्कचे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते उद्घाटन झाले. गुरुवारपासून ही वास्तू सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. सध्या तिकीटपद्धतीने हे नवे दर आकारले जाणार असून 8 दिवसानंतर स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहेत. मात्र आधीपेक्षा आता येथील प्रवेश शुल्क महाग झाले आहे. शहरातील ही लँडमार्क वास्तू आता मेकओव्हर करुन खुली करण्यात आल्याने आबालवृद्धांनी आनंद व्यक्त केला आहे.
कोरोनाकाळापासून जवळजवळ 3 वर्षापेक्षा अधिक काळ सर्वसामान्यांसाठी हे पार्क बंद आहे. त्यामुळे हे पार्क कधी सुरु होणार याची उत्सुकता शाळांना सुट्टी लागलेल्या बच्चेकंपनीसह पालकांना होती. उद्याने, पार्क ही सध्याच्या धकाधकीच्या काळाची गरज असून वंडर्स पार्क सुरु झाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत मुख्यमंत्री महोदयांनी याठिकाणी असलेल्या जगातील 7 आश्चर्यांच्या प्रतिकृती व इतर अनेक गोष्टी याचा उपयोग लहानथोरांच्या विरंगुळ्यासाठी होईल असे सांगितले. वंडर्स पार्कचे मेकओव्हर करण्यात आले असून वंडर्स पार्कमध्ये असलेली आकर्षक खेळणी, जगातील सात आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती यासह अँम्पीथिएटर याबरोबरच आकर्षक तलाव खेळण्यासाठी असलेली प्रशस्त जागा यामुळे येथे नेहमीच पार्क सुरु झाल्यापासूनच गर्दी पाहायला मिळत होती.
आता त्यात नव्याने करण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटन लेझर शोसहित, ऑडिओ व्ह्युजअल यंत्रणा नविन बसविणे, तलावांची दुरूस्ती,वॉक वे सुधारणा,नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे तसेच खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे,सर्व ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसविणे,प्रवेशद्वारावर बायोमॅट्रीक मशीन लावणे,नवीन विद्द्युत दिव लावणे, उद्यानात आकर्षक कारंजे अशी जवळजवळ 23 कोटी पेक्षा अधिकच्या खर्चातून वंडर्स पार्कचे पूर्णतः मेकओव्हर करण्यात आले आहे. त्यामुळे या उद्यानाचे प्रवेशमूल्य वाढवण्यात आले आहे. सुरवातीला काही दिवस तिकीटपद्धतीने हे नवे दर आकारले जाणार असून 8 दिवसानंतर नागरीकांना उद्यानातील प्रवेश व तिकीटासाठी बँकेशी करारनामा करुन स्मार्ट कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता यांनी दिली आहे.
वंडर्स पार्कच्या नुतनीकरणाचा लोकार्पणासोबतच कोपरखैरणे व ऐरोली येथील अत्याधुनिक टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांटचा लोकार्पण समारंभ, सेक्टर 3 वाशी येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीभवन बहुउद्देशीय इमारतीचा लोकार्पण समारंभ तसेच सेक्टर 11 सानपाडा येथील सेंट्रल लायब्ररीचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. केवळ टोलेगंज इमारती म्हणजे विकास नाही तर नागरिकांना आवश्यक असणाऱ्या दर्जेदार सुविधा पुरविणे म्हणजे खरा विकास असल्याचे मत व्यक्त करीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकाभिमुख निर्णय घेण्यासाठी कटिबध्द असणारे हे आपले सरकार नवी मुंबईच्या अधिक वेगवान विकासासाठी संपूर्ण सहकार्य राहील असे मत व्यक्त केले.
1. ऐरोली विधानसभा आ.गणेश नाईक यांनी लोकार्पण होत असलेल्या सुविधा नवी मुंबईकर नागरिकांसाठी लाभदायी असल्याचे सांगत नागरी सुविधांसाठी सिडकोमार्फत देण्यात येणाऱ्या भूखंडांचा प्रश्न मांडला व याविषयी आणि शहराच्या दृष्टीने इतर महत्वांच्या विषयांबाबत शासन स्तरावर बैठक आयोजित करण्याची विनंती केली.
2. बेलापूर विधानसभा आ.मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईमध्ये वंडर्स पार्क सारखी नागरिकांना व पर्यटकांना बघण्यासाठी अनेक ठिकाणे असल्याचे सांगत सर्वसामान्य नवी मुंबईकरांची आरोग्यविषयक गरज लक्षात घेऊन सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे राहण्यासाठी यापुढील काळातही असेच सहकार्य करण्याची विनंती केली.
3. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी एकूण 237 कोटी रक्कमेच्या नवी मुंबईतील 4 महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्री महोद्यांच्या शुभहस्ते होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत वंडर्स पार्क, महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीभवन व नियोजित सेंट्रल लायब्ररी हे लोकोपयोगी प्रकल्प तसेच टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांट हा पर्यावरणपूरक आणि लाभदायी प्रकल्प नवी मुंबईच्या विकासाला नवी गती देणारा असल्याचे सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai