Breaking News
रायगडावर ढोल-ताशांच्या गजरात राज्याभिषेक सोहळा
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 349 वा वर्धापनदिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. शिवराज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत आणि पुण्यातील लाल महलामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त मावळ्यांच्या वेशभूषेत किल्ले रायगडावर दाखल झाले होते. या सोहळ्याच्या निमित्तानं किल्ले रायगडावर एकीकडे ढोलताशाचा गजर सुरू होता, तर दुसरीकडे गुलालाची उधळण करण्यात आली. या सोहळ्याला धनगर नृत्यानं तर आगळीच बहार आणली. छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी विधिवत पूजा करून शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन साजरा केला. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी चंदुकाका सराफ अँड सन्सकडून सोन्याच्या खास 350 होनांची निर्मिती करण्यात आली होती. याच सोन्यांच्या होनांनी शिवरायांना अभिषेक करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. या शिवभक्तांनी केलेल्या शिवरायांच्या जयघोषानं अवघा रायगड दुमदुमून गेला होता.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संभाजीराजे यांनी आम्हाला 50 कोटी नकोत तर राज्यातील 50 किल्ले ताब्यात द्या, त्यांचे संवर्धन, रायगड मॉडेल करुन दाखवतो असे आवाहन राज्य सरकारला केले. संपुर्ण देशभरातून आलेल्या लाखो शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai