Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांकरता आकारले जाणारे मंडप शुल्क आणि अनामत रक्कम माफ करण्यात येत असल्याचे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी जाहीर केले आहे.
पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार हा निर्णय जाहीर करण्यात आला असून अशाच प्रकारची मागणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे, विविध लोकप्रतिनिधी व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांच्याकडूनही करण्यात आली होती. त्यास अनुसरून आयुक्तांनी शुल्क माफीचा निर्णय जाहीर केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने मंडप उभारण्याची परवानगी देण्याची ‘ई सेवा संगणक प्रणाली' सुरू केली असून 19 ऑगस्ट पासून मंडळांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सर्व गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक परवाना प्राप्त करून घ्यावयाचा असून त्याकरता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. परंतु परवानगी घेणे आवश्यक आहे.
19 ऑगस्टपासून या ऑनलाइन परवानगी प्रक्रियेला सुरुवात झाली असून गणेशोत्सवाच्या दहा दिवस अगोदरपर्यंतच ऑनलाईन परवानगी प्रणाली सुरू राहील याची मंडळांनी नोंद घ्यावयाची आहे. पालिका क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी अतिशय उत्साहात पर्यावरणाचे भान ठेवून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai