Breaking News
मुंबई ः मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतले. उपोषण मागे घेताना पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांची मुदत दिली आहे. मराठा समाजाला 2 जानेवारीपर्यंत सरसकट टिकणारे आरक्षण न दिल्यास मराठे मुंबईत धडकतील असा इशारा देण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कुणबी नोंदी महाराष्ट्रभर शोधण्याचे आदेश दिले आहेत.
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्यास एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तसंच या कामाच्या संनियत्रणासाठी मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी यांची देखील यावेळी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“आज मी मुख्य सचिवांपासून संबंधित विभागांची बैठक घेतली. यावेळी त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्याप्रमाणे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात जस्टीस शिंदे कमिटीने कुणबी प्रमाणपत्रं दिली आहेत तसंच काम राज्यभरात झालं पाहिजे असं सांगितलं आहे. मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी जो काही सर्व्हे करण्याची गरज आहे त्यासंबंधी सूचना देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना विशेष कक्ष स्थापन करण्याचा, त्यासाठी लागणारं मनुष्यबळ, यंत्रणा उपलब्ध करुन देण्याचा तसंच स्वत लक्ष ठेवावं असा आदेश दिला आहे. विभागीय आयुक्तही यावर लक्ष ठेवून असतील. याशिवाय राज्य पातळीवरही लक्ष ठेवत आढावा घेतला जाईल. जेणेकरुन काही त्रुटी राहिल्यास त्याची पूर्तता करता येतील,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
मराठवाड्यात शिंदे समितीने शिफारस केलेल्या पुराव्यांच्या आधारे कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करावी त्याचबरोबर प्रांत अधिकारी, तहसीलदार व जातपडताळणी समित्यांमधील अधिकारी, कर्मचारी यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण द्यावे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
विरोधकांनीदेखील सहकार्य करण्याची गरज आहे. आम्ही त्यासाठी बैठक बोलावली होती. शरद पवार, काँग्रेस यासह सर्वजण बैठकीत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सर्वांचं एकमत झालं आहे. कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी अशीही सर्वांची इच्छा आहे. यामुळे टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळावं यासाठी विरोधकांनी सहकार्य करण्याचं आवाहन आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai