Breaking News
29.60 लाख रुपयांच्या साठा जप्त; 222 आरोपींना अटक
मुंबई : संपूर्ण राज्यात 20 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थाबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान संपूर्ण राज्यात एकूण 220 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून तीन वाहने जप्त केली आहेत. याशिवाय 180 आस्थापना सील करून एकूण 29 लाख 66 हजार 928 रुपयांचा साठा जप्त करून या सर्वप्रकरणी पोलिसांकडे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण 222 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एप्रिल 2023 पासून 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने राज्यात एकूण 676 ठिकाणी कारवाई करून 95 वाहने जप्त केली असून 413 आस्थापना सीलबंद केल्या आहेत. तसेच एकूण 17 कोटी 64 लाख 74 हजार 674 रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. सर्वप्रकरणी पोलिसांकडे गुन्हे नोंदविण्यात आले असून एकूण 709 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईचे स्वरूप व व्याप्ती मोठी आहे. संपूर्ण राज्यात जुलै 2012 पासून गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारी, सुगंधीत तंबाखू व तत्सम पदार्थाच्या उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक (महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून) व विक्रीस जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिबंध घालण्यात येत आहे. त्यानुसार, 20 जुलै 2023 पासून या अन्न पदार्थावर एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.
या अन्न पदार्थांचे उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक (महाराष्ट्र राज्यामध्ये व महाराष्ट्र राज्यातून व विक्रीस प्रतिबंध असला तरीही काही असामाजिक तत्वे चोरीछुपे मार्गाने सदर प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या विक्रीचा व्यवसाय आर्थिक लाभाच्या हेतूने करत असतात. या असामाजिक तत्त्वावर आळा बसावा तसेच बंदी आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन सदैव तत्पर असून सदर प्रतिबंधित पदार्थाचा अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या असामाजिक तत्त्वावर अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 व नियम, 2011 नुसार निरंतर कारवाई करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai