Breaking News
पेण : गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून जगभरात पेणची ओळख आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये गणेशमूर्तींचे हजारो कारखाने असून गणेशोत्सवात लाखो गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना होतात. मात्र काही मूर्तिकार हुबेहूब मूर्ती साकारून भक्तांची फसवणूक करीत असल्याने यापुढे हे प्रकार थांबणार आहेत. पेणच्या गणेशमूर्तींना भौगोलिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडिकेशन) मिळाल्याने स्थानिक मूर्तिकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शहरासह तालुक्यातील अंतोरे, हमरापूर, कळवा, जोहे, तांबडशेत, दादर या भागांमध्ये गणेशमूर्तींचे अनेक कारखाने असून असंख्य गणेशमूर्तिकार आपल्या कलेनुसार मूर्ती घडवतात. त्यामुळे पेणच्या व्यावसायिकांनी गणेशमूर्तींना ‘जीआय' मानांकन मिळावे, यासाठी चेन्नईतील जीआय नोंदणी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या स्वामित्व विभागाने मान्यता दिल्याने पेणच्या गणेशमूतींना खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाला आहे.
भौगोलिक मानांकनामुळे देशातच नव्हे तर जगभरात त्या ठिकाणची वेगळी ओळख निर्माण होते. पेणच्या गणेशमूर्तीना मानांकन मिळाल्यामुळे पुढील वर्षी गणेशोत्सवात मागणीत निश्चित वाढ होण्याची शक्यता आहे. मूर्तींची हुबेहूब नक्कल करून किंवा नावाचा वापर करून भक्तांची फसवणूक केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai