Breaking News
सरळ सेवा भरतीच्या लाभासाठी शासनाचे परिपत्रक
मुंबई : सामाजिक आरक्षण आणि खुल्या प्रवर्गातील विशिष्ट घटकांना दिलेल्या समांतर आरक्षणाची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता राज्य सरकारने त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश गुरुवारी एका परिपत्रकाद्वारे दिले.
राज्यात शासन सेवेत सरळसेवा भरती करताना मागासवर्गींयासाठी आरक्षण धोरण लागू आहे. सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण असे सुरू दोन प्रकारात ते मिळते. पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे सामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील त्यांच्या कोट्याव्यतिरिक्त निवडले जाऊ शकत होते. मात्र आघाडी शासनाच्या कार्यकाळात 13 ऑगस्ट 2014 रोजी जारी झालेल्या परिपत्रकामुळे हे सामाजिक आरक्षणाला लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला गैरलागू झाले. त्यामुळे मेरिटमध्ये असूनही मागासवर्गीय उमेदवारांवर या परिपत्रकामुळे अन्याय होत होता. समांतर आरक्षणाच्या 13 ऑगस्ट 2014 रोजीच्या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार मागासवर्गीय उमेदवारांचा खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाच्या पदांसाठी विचार करता येत नव्हता. त्यामुळे 27 ऑगस्ट 2018 रोजीच्या बैठकीत 13 ऑगस्ट 2014 चे परिपत्रक रद्द करून तातडीने सुधारित परिपत्रक काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याला अनुसरून सामान्य प्रशासन विभागाने 19 डिसेंबर 2018 रोजी शुद्धिपत्रक काढून पुन्हा समांतर आरक्षण लागू केले. या शुद्धिपत्रकामुळे आगामी काळात होणाऱ्या मेगा भरतीमध्ये मागासवर्गीयांना मोठी संधी मिळाली. मात्र त्याची काटेकोर अमंबजावणी होत नसल्याचे शासनाच्या निर्दशनास आले. त्यामुळे 25 जानेवारी 2024 रोजी राज्य सरकारने त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारे दिले.
समांतर आरक्षण हे राज्यात 72 टक्के इतके आहे. ते सामाजिक आरक्षण व खुल्या प्रवर्गात दिले जाते. यात सर्वांत जास्त 30 टक्के आरक्षण महिलांना दिले जाते. समांतर आरक्षण हे एका सामाजिक आरक्षण प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येत नाही. समांतर आरक्षणासाठी घटकनिहाय राखून ठेवलेल्या जागेवर सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास, सदर पदे संबंधित समांतर आरक्षण घटकांसाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून त्या त्या सामाजिक प्रवर्गात गुणवत्तेवर देण्याबाबत कार्यवाही करावी. समांतर आरक्षणाची अंमलबजावणी कितपत झाली याची प्रत्येक विभागाने आकडेवारी द्यावी असेही परिपत्रकात म्हटले आहे.
समांतर आरक्षण
राज्यात एकूण सामाजिक आरक्षण किती?
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai