Breaking News
जागा वाढवून घेण्यासाठी शिंदे, अजित पवार गट प्रयत्नशील
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपासाठी वाटाघाटी सुरु आहेत. भाजपने आम्ही लोकसभेच्या 32 जागा लढवू असे सांगितल्यानंतर शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडे नवनवे प्रस्ताव पाठवले जात आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या वाट्याला कमी जागा येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगेसच्या वाट्याला कमी जागा येत असल्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर उमटताना दिसतोय. कार्यकर्त्यांकडून जागा वाढवून घेण्यासाठी वरिष्ठांवर दबाव आणला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या सगळ्यात अजित पवार गट नाराज असल्याचे बोलले जात असून आम्हाला शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात असा हट्ट गटातील वरिष्ठांनी धरला आहे. परंतु, अजित पवार गटाला शिंदे गटाइतक्या जागा द्यायच्या झाल्यास भाजपने आखलेले लोकसभा निवडणुकीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना अजितदादा गटाकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ हे सातत्याने ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटापेक्षा कमी जागा घेणार नाही, आम्ही त्यांच्याइतक्याच लोकसभेच्या जागा लढवू', असे सांगत आहेत. याविषयी फडणवीसांना विचारले असता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटले की, कोणी काही मागायला हरकत नाही. पण लोकसभा जागावाटपाचा निर्णय हा वास्तविकतेवर आधारित होईल, असे फडणवीसांनी म्हटले. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप शिंदे गटाला लोकसभेच्या 12 ते 13 जागा देऊ शकतो. या आकडेवारीनुसार अजितदादा गटाच्या वाट्याला केवळ तीन ते चार जागा येऊ शकतात. हा प्रस्ताव भाजप अजित पवारांच्या गळी कसा उतरवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. वाट्याला एक अंकी आकडा येत असल्यामुळे पक्षातील नेत्यांकडून अमित शाह यांच्याकडे जादा जागांची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai