Breaking News
सर्वोच्च न्यायालयाचे एसबीआयला आदेश; मुदतवाढीच्या अर्ज फेटाळला
मुंबई ः गेल्या महिन्याभरापासून निवडणूक रोख्यांचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील आपल्या ऐतिहासिक निकालात मोदी सरकारची निवडणूक रोखे योजना बासनात गुंडाळली. ही योजना घटनाविरोधी असल्याचं सांगत न्यायालयाने यासंदर्भात 2019 पासूनची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश एसबीआयला दिले. मात्र, मुदत उलटल्यानंतरही एसबीआयनं मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला होती. हा अर्ज आज न्यायालयानं फेटाळला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर ठरवल्यामुळे गुप्त पद्धतीने राजकीय पक्षांना देणग्या देणाऱ्यांची नावं आणि त्यांनी किती देणगी दिली हे उघड होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार एसबीआयकडून 2019 पासून जारी करण्यात आलेल्या सर्व निवडणूक रोख्यांची यासंदर्भातली माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. मात्र, विहीत मुदतीत ही माहिती सादर करण्यात स्टेट बँक ऑफ इंडियाला अपयश आल्यानंतर न्यायालयाने यांना आजच्या सुनावणीवेळी फैलावर घेतले. एसबीआयने याचिकेसोबत सादर केलेल्या अर्जामध्ये दिलेल्या तपशीलानुसार, जी माहिती मागवण्यात आली आहे, ती तयार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारी एसबीआयची विनंती फेटाळण्यात येत आहे अशा शब्दांत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एसबीआयची याचिका फेटाळून लावली.
दरम्यान, मुदतवाढ मागण्यासाठी एसबीआयकडून वरीष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. संबंधित माहिती गोळा करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. आम्हाला खरंतर असं करताना संपूर्ण प्रक्रियाच उलटी करावी लागत आहे. कारण एक बँक म्हणून आम्हाला ही सर्व माहिती गुप्त ठेवण्यास सांगण्यात आले होत, असं हरीश साळवे म्हणाले. मात्र, खंडपीठातील दुसरे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला. तुम्हाला फक्त सीलबंद पाकिट उघडायचं आहे, माहिती घ्यायची आहे आणि निवडणूक आयोगाला द्यायची आहे. निवडणूक आयोगाला ही सर्व माहिती सीलबंद पद्धतीने सादर करण्यास सांगण्यात आलं होतं, असं न्यायमूर्ती खन्ना म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai