Breaking News
मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी म्हणजे 12 मार्चला दुपारी 2 वाजता नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. 13 मार्चला धुळे, मालेगाव, 14 मार्चला नाशिक, 15 मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा 16 मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. 17 मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होत असून याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या (2024) प्रचाराचे रणशिंग फुंकलं जाणार आहे.
भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात 15 जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली असून यात्रेची सांगता मुंबईत होणार आहे. ही यात्रा 15 राज्यं, 100 जिल्हे, 110 लोकसभा मतदारसंघातून 67 दिवसांत 6700 किमीचा प्रवास केला आहे. “भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक” या घोषवाक्यासह ही यात्रा मार्गक्रमण करत आहे. गेल्या वर्षी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 4000 किमीची पदयात्रा काढली होती. या यात्रेला जनतेचं प्रचंड समर्थन लाभलं होतं. आता भारत जोडो न्याय यात्रेलाही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो न्याय यात्रेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जय्यत तयारी केली असून मुंबईत राहुल गांधी आणि न्याय यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेला आणि शिवाजी पार्क वरील जाहीर सभेला प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai