Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्यावतीने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यावर धडक कारवाई करण्यात येत असून पावसाळापूर्व कालावधीत मे महिन्यामध्ये आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. अतिक्रमित झोपडपट्टी हटाव मोहीम प्रभावीपणे राबविली असून मे महिन्यात 1203 इतक्या मोठया संख्येने अनधिकृत झोपडया हटविलेल्या आहेत.
बेलापूर विभागात दुर्गानगर, पंचशिल नगर, बेलापूर उड्डाणपूलाखाली, से.28 येथील विठ्ठल मंदिराच्या बाजूला अशा एकूण 251 अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई केलेली आहे. तसेच नेरुळ विभागात से.9 पाण्याच्या टाकीच्या बाजूला, महात्मा गांधीनगर बालाजी मंदिराच्या बाजूला अशा 90 अनधिकृत झोपडया हटविण्यात आलेल्या आहेत. वाशी विभागामध्ये हायटेन्शन वायरच्याखाली, मुंबई पुणे मार्गालगत वाशी गाव टोलनाक्याच्या बाजूला अशा दोन ठिकाणच्या 818 अनधिकृत झोपडयांवर कारवाई करण्यात आलेली आहे. घणसोली विभागात पामबीच मार्गालगत साईबाबा मंदिराजवळील 27 अनधिकृत झोपडया तसेच ऐरोली विभागात ठाणे बेलापूर रस्त्यानजिक भारत बिजली कंपनी समोरील रेल्वे रुळांनजिक अनधिकृतरित्या वसलेल्या 15 झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. दिघा विभागातही ईश्वरनगर आणि विष्णुनगर येथील 2 अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आल्या आहेत.
मे महिन्यात पावसाळा पूर्व कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांतील 1203 अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आली असून पावसाळी कालावधीत नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास दुर्घटना घडू नये म्हणून डोंगर पायथ्याशी असलेल्या दरड प्रवण क्षेत्रातील झोपडपट्टया हटविण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai