Breaking News
सकाळी 9 ते सूर्यास्तापर्यंत बांधकामांना परवानगी; लोखंडी साहित्य रबराने आच्छादित करावे
नवी मुंबई : शहरात सुरु असलेली बांधकामे, पुनर्वसन प्रकल्पाची कामे यामुळे दिवसरात्र धडधड सुरु असून वायु आणि ध्वनी प्रदुषणाला हातभार लागत आहे. याचा परिणाम आजपास राहणाऱ्या रहिवाशांना होत असतो. या बांधकामांसाठी पालिकेने नियमावली बनवावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होती. अखेर पालिकेने सकाळी नऊ वाजल्यापासून सूर्यास्त होईपर्यंतच ही बांधकामे सुरू राहतील असा स्पष्ट नियम यापुढे अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये इमारतीचा पाया खणण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियंत्रित स्फोटांमुळे आसपासच्या इमारतींना बसणारे हादरे आणि बांधकाम ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत असताना महापालिका प्रशासनाने या प्रकारांना आळा बसावा यासाठी एका विशेष नियमावलीची आखणी केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मध्यंतरी यासंबंधी एका विशेष अभ्यासगटाची नियुक्ती केली होती. या विशेष अभ्यासगटामार्फत ही नियमावली तयार करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. ठराविक वेळेतच बांधकाम प्रकल्पांची कामे सुरू ठेवण्याचा हा महत्त्वाचा निर्णय या नव्या नियमावलीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. शहरातील जवळपास सर्वच उपनगरांमध्ये ही बांधकामे कधी सुरू करावीत आणि कधी थांबवावीत यासंबंधी कोणतीही ठोस नियमावली अमलात आणली जात नव्हती. वाशी, सीवूड्ससारख्या उपनगरांमध्ये तर रात्री उशिरापर्यंत बांधकामे सुरू असल्याने आसपासच्या नागरी वसाहतींमधील रहिवासी मेटाकुटीस आले होते. पोलिसांकडे तक्रार करावी तर दाद मिळत नाही आणि महापालिकेच्या स्थानिक कार्यालयातील अधिकारी उभे करत नाहीत अशी रहिवाशांची अवस्था झाली होती. गेल्या महिन्यात नेरुळ येथे एका बांधकामात केलेल्या स्फोटातील दगड उडून रस्त्यावरील पादचारी महिलेच्या डोक्यात पडला होता. यामुळे रक्तस्त्राव होऊन महिलेच्या डोक्याला टाके पडले होते. या दुर्घटनेनंतर नागरिकांकडून तीव्र नाराजी व संताप व्यक्त झाला होता. या गंभीर घटनेनंतर पालिकेने नियमावलीसंदर्भात सुत्रे हलविण्यास सुरुवात केली.
महानगरपालिकेने केलेल्या नव्या नियमांमध्ये यापुढे सकाळी नऊ वाजताच बांधकाम सुरू करता येणार आहे. ही बांधकामे सूर्यास्त होताच थांबवावीत असा नियम करण्यात आला असून यावर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक विभाग अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक कार्यरत राहील, असे ठरविण्यात आले आहे. याशिवाय या नव्या नियमावलीत ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अद्यायावत सामुग्री तसेच लोखंडी धातूच्या वस्तू वापरताना सदर साहित्य रबराने आच्छादित करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai