Breaking News
डांबरीकरणाचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करण्याची मागणी
नवी मुंबई ः पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी सर्वच नगरसेवकांनी कामांचा धुमधडाका नवी मुंबईत लावला आहे. त्यातच अनेक विभागात डांबरीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले असून, कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. डांबरीकरण आहे की रस्त्यांना पालिका काळे फासत आहे, असा सवाल करून या कामांची त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
तुकाराम मुंढे व रामास्वामी यांच्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीत पालिकेने सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची बचत करून ते फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात बँकेत ठेवले आहेत. गरजेनुसार आवश्यक असलेल्या कामांनाच मंजुरी मागील दोन्ही आयुक्तांनी दिल्याने अनावश्यक खर्च वाचला होता, परंतु विद्यमान आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या कारकीर्दीत मात्र नगरसेवकांनी उचल खाल्ली असून मागील तीन वर्षांतील कामांच्या उपासमारीचा फडशा निवडणुकीच्या तोंडावर पाडला जात असल्याचे नवी मुंबईकरांना पाहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी चांगली असलेली जुनी गटारे व पदपथ जेसीबी, बे्रकर लावून तोडण्यात येत असून तेथे नवीन पावसाळी गटारे बांधण्यात येत आहेत. या कामांची गरज काय? असा सवाल करदाते नवी मुंबईकर विचारत असून अधिकारी, नगरसेवक व ठेकेदार यांच्या अभद्रयुतीविरुद्ध बोटे मोडत आहेत. वाशी प्रभागात सर्वत्र डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचा आरोप सिडकोतील माजी अभियंत्याने ‘आजची नवी मुंबई’शी बोलताना व्यक्त केला. अनेक ठिकाणी डांबरीकरणाचे सपाटीकरण व्यवस्थित न झाल्याने उंचसखलपणा रस्त्याच्या पृष्ठभागावर राहिला आहे. पावसाळ्यात यात पाणी जमा होऊन खड्डे पडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. शिवाय डांबरीकरणाची जाडी ही नियमांनुसार नसल्याने ठेेकेदारांना फायदा देण्यासाठी याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत किंबहुना कामाच्या ठिकाणी अधिकारीच उपस्थित नसल्याचे पाहावयास मिळत आहे. वाशीत झालेली कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याने रस्त्यांना ‘काळे फासण्याचे काम’ पालिका अधिकारी व ठेेकेदार यांनी संगनमताने केल्याचा आरोप नवी मुंबईकर करत आहेत. शिवाय, पालिकेमध्ये अधिकार्यांवर आपल्या ज्ञानाच्या दिव्यत्वाने आरोप करणारे नगरसेवक या वेळी कामांच्या दर्जाबाबत गप्प का? असा सवाल करदात्या नवी मुंबईकरांना पडला आहे. वाशी प्रभागात झालेल्या सर्व डांबरीकरणाच्या कामाचे त्रयस्थ पक्षाकडून ऑडिट करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai