Breaking News
होल्डींग पाँडच्या नुतनीकरणासाठी विशेष समिती
नवी मुंबई ः पावसाळी कालावधीत ज्यामुळे शहराचे पावसाळी पाण्यापासून रक्षण होते अशा होल्डींग पाँडची साफसफाई अभावी गाळ साचल्याने पाणी धारण क्षमता कमी झाल्याने भरतीच्या वेळी मोठया प्रमाणात पाऊस झाल्यास पाणी शहरातील सखल भागात साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभुमीवर पर्यावरण विभागाचे प्रमुख म्हणून आयआयटी मधील तज्ज्ञांसोबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आयआयटी मुंबईचे प्रा.व्ही. ज्योती प्रकाश आणि आर.एस.जांगीड यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी त्या परिसरातील नाले व होल्डींग पाँड यांचीही पाहणी केली. तसेच नैसर्गिक नाले व होल्डींग पाँडचे नुतनीकरण करणेकरिता विशेष समिती गठीत करण्यात येत आहे.
सिडकोमार्फत शहर वसवताना नवी मुंबई शहर हे समुद्रसपाटीच्या भरती रेषेपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने डच पध्दतीने होल्डींग पाँडची रचना करण्यात आली आहे. या रचनेमुळे पावसाळी कालावधीमध्ये शहरातून येणारे पावसाचे पाणी होल्डींग पाँडमध्ये जमा होते व ओहोटी लागल्यानंतर सदर पाणी होल्डींग पाँडच्या पाईप आऊटलेट मधून खाडीमध्ये जाते. या व्यवस्थेमुळे शहरामध्ये पाणी साचून राहत नाही. तथापि इतक्या वर्षात या होल्डींग पाँडमध्ये मोठया प्रमाणात गाळ जमा होऊन खारफुटींचीही वाढ झाल्याने होल्डींग पाँडची पाणी धारण क्षमता कमी झाल्याने भरतीच्या वेळी मोठया प्रमाणात पाऊस झाल्यास होल्डींग पाँड मध्ये पावसाचे पाणी सामावून घेण्यासाठी जागा नसल्याने ते पाणी शहरातील सखल भागात साचत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर उपाय म्हणजे सदर होल्डींग पाँड गाळ काढून स्वच्छ करणे हा असून त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस आवश्यक परवानगी मिळणेसाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा करण्यात येत आहे. ही बाब उच्च न्यायालय मुंबई यांच्या पटलावर आहे.
ही वस्तुस्थिती विचारात घेता या विषयी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड यांचेमार्फत पर्यावरण विभागाचे प्रमुख म्हणून आयआयटी मधील तज्ज्ञांसोबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आयआयटी मुंबईचे प्रा.व्ही. ज्योती प्रकाश आणि आर.एस.जांगीड यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या तज्ज्ञांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाणी साचलेल्या भागांची पाहणीही केली. तसेच त्या परिसरातील नाले व होल्डींग पाँड यांचीही पाहणी करण्यात आली. तज्ज्ञ व्यक्तींमार्फत करण्यात आलेल्या या पाहणीचा अहवाल व निरीक्षणे प्राप्त करुन घेण्यात येत असून त्यानुसार होल्डींग पाँड मधील गाळ काढणे व अनुषांगिक कामे करणेबाबत उच्च न्यायालय, मुंबई तसेच महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण यांची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही गतीमानतेने करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने सन 2005 मधील होल्डींग पाँडची स्थिती तसेच इतक्या वर्षातील पर्जन्यवृष्टीचे प्रमाण यांचीही तपासणी करण्यात येणार असून आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नमुंमपा क्षेत्रातील नैसर्गिक नाले व होल्डींग पाँडचे नुतनीकरण करणेकरिता विशेष समिती गठीत करण्यात येत आहे. समितीमध्ये आयआयटीच्या या दोन तज्ज्ञांसह सिडकोचे विद्यमान मुख्य नियोजनकार रविंद्रकुमार मानकर हे समिती सदस्य असणार आहेत. तसेच पालिकेमार्फत सिडकोचे निवृत्त नियोजनकार रवीकुमार यांचाही समितीत सदस्य म्हणून समावेश असणार आहे. सिडकोमार्फत शहर वसविताना पावसाळी पाण्याच्या नियोजनाच्या दृष्टीने होल्डींग पाँडची रचना करण्यात आल्याने या दोन्ही तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे. आयआयटीच्या तज्ज्ञांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करुन प्राप्त होणारा अहवाल परवानगीसाठी महत्वाचा ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai