Breaking News
नवी मुंबई ः पालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत नवी मुंबई शहरातील वृक्ष संरक्षण आणि संवर्धन विषयी अनेक महत्वाच्या विषयांवर सांगोपांग चर्चा होऊन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच प्रत्येक वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण हाती घेऊन वृक्षघनता वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. झाडे स्थलांतर करण्यासंदर्भात वृक्षसंगोपन तज्ज्ञ यांचा पाहणी अहवाल बंधकारक करण्यात आला आहे.
या बैठकीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षगणना अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार नवी मुंबई शहरात 15 लक्ष 28 हजार 779 इतकी वृक्षसंपदा असून त्यामध्ये 11 लक्ष 43 हजार 937 इतकी देशी प्रजातीची झाडे आहेत व 3 लक्ष 84 हजार 842 बिगर देशी प्रजातीची झाडे आहेत. त्यापैकी 1,638 हेरिटेज वृक्ष अस्तित्वात आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 111 प्रभागांचा विचार करता घणसोली वॉर्डमध्ये सर्वाधिक वृक्षघनता असल्याचे आढळून आले आहे. तसेच तुर्भे वॉर्डमध्ये सर्वात कमी वृक्षघनता असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने चर्चेअंती आयुक्तांनी प्रत्येक वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण हाती घेऊन वृक्षघनता वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीमध्ये यंदाच्या पावसाळी कालावधीत पाऊस आणि जोरदार वारे यामुळे उन्मळून पडलेल्या 205 झाडांचा अहवाल सादर करण्यात आला. त्या अनुषंगाने कोणती झाडे उन्मळून पडली यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती मोठ्या प्रमाणात उन्मळून पडलेल्या झाडांची लागवड करू नये असे सर्वानुमते निश्चित करण्यात आले व आयुक्त महोदयांनी तसा निर्णय घेतला. त्यानुसार सुबाभूळ, गुलमोहर, रेन ट्री, ओकेसिया, विलायती चिंच, निलगिरी इत्यादी झाडांची लागवड न करण्याचे ठरविण्यात आले. तसेच पिंपळ, पेल्ट्रोफोरम, अशोका, आंबा, जांभूळ, भेंडी, सुरू, कांचन, कडुलिंब, सायकस, वड, करंज, उंबर, बदाम अशा पावसाळ्यात कमी नुकसान झालेल्या झाडांची वृक्ष लागवड करण्याचे सूचित करण्यात आले.
याशिवाय वृक्ष प्राधिकरण बैठकीत झाडे स्थलांतर करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये वृक्षसंगोपन तज्ज्ञ यांची नियुक्ती करून त्यांचा पाहणी अहवाल असणे बंधनकारक राहील असा निर्णय घेण्यात आला. तसेच विकास कामात अडथळा येणाऱ्या झाडांच्या तोडणीस अथवा स्थलांतराच्या प्रस्तावास मंजूरी देताना झाडांचा जातीनुसार, तसेच झाडांच्या वयानुसार अहवाल सादर करणे आवश्यक राहील असेही सूचित करण्यात आले. त्यानुसार संबंधित अर्जदाराने वृक्षतोड अथवा स्थलांतरासंदर्भात सादरीकरण केल्यानंतरच वृक्षतोड अथवा स्थलांतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असे निश्चित करण्यात आले. याबाबत आयुक्तांनी वृक्षसंपदा रक्षणाच्या दृष्टीने वृक्षतोड करण्यापेक्षा वृक्ष स्थलांतर करण्याच्या पर्यायाचा अवलंब करण्याचे सूचित केले.
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीस उद्यान विभाग उपआयुक्त तथा वृक्ष प्राधिकरणाचे सचिव दिलीप नेरकर, उद्यान विभाग सहा. आयुक्त ऋतुजा गवळी, उद्यान अधिक्षक प्रकाश गिरी व भालचंद्र गवळी, आर. एफ. ओ. सामाजिक वनीकरण विभाग ठाणे आणि वाटाणे, पर्यावरण सहाय्यक एपीएमसी, वाशी इत्यादी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai