Breaking News
नवी मुंबई : स्वच्छतेची सवय मुलांमध्ये लहान वयापासूनच रुजावी यादृष्टीने विद्यार्थ्यांना केंद्रीभूत ठेवून पालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. अशाच प्रकारचा आंतरशालेय दिंडी स्पर्धा हा अभिनव उपक्रम क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दिंडी' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा महाअंतिम सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात प्रचंड जल्लोशात संपन्न झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा शाळा क्रमांक 104, आंबेडकर नगर, रबाळे यांना सर्वोत्तम सादरीकरणाबद्दल प्रथम क्रमांक मिळाला आहे.
क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने, घनकचरा व्यवस्थापन विभाग व शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने, आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय दिंडी स्पर्धा मध्ये 91 शाळांची प्राथमिक फेरी 5 व 6 ऑगस्ट रोजी विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे विनारंगभूषा व वेशभूषा पार पडली. त्यामधून 21 शाळांची निवड प्राथमिक फेरीचे परीक्षक सुप्रसिध्द नाटय व मालिका कलावंत कुणाल मेश्राम यांनी महाअंतिम फेरीसाठी केली. या महाअंतिम फेरीचे परीक्षण सुप्रसिध्द सिने, नाटय व मालिका अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी केले. या स्पर्धेमध्ये सहभागी शाळांनी स्वच्छता विषयांतर्गत - कचऱ्याचे विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी, खारफुटीचे संवर्धन, जलस्त्रोत (वॉटरबॉडी) स्वच्छ्ता आणि संवर्धन, माझी वसुंधरा उपक्रम, नवी मुंबई शहर सुशोभिकरण अशा सहा मुद्दयांना अनुसरून 7 मिनीटांचे सादरीकरण केले. यामध्ये भजन, कीर्तन, पोवाडा, भारूड, वारीतील रिंगण, वारीतील विशिष्ट नृत्य, सामाजिक संदेश देणारा अन्य सांस्कृतिक कलाप्रकार अशा विविध प्रकारे सादरीकरण करण्यात आले. स्वच्छता दिंडी स्पर्धेचे अंतिम विजेतेपद राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा शाळा क्र. 104, आंबेडकर नगर, रबाळे यांनी पटकाविले. व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक श्रीराम विद्यालय, ऐरोली आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक डीएव्ही पब्लिक स्कुल नेरुळ यांनी संपादन केले. व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रू. 20 हजार व रू. 15 हजार रक्कमेची पारितेषिके सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रासह प्रदान करण्यात आली. याशिवाय नमुंमपा शाळा क्रमांक 49, ऐरोलीगाव ही शाळा नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील सर्वोत्कृष्ट दिंडी पारितोषिकाची रु. 15 हजार रक्कमेसह मानकरी ठरली. नमुंमपा शाळा क्रमांक 78 काशिराम हिंदी विद्यालय, गौतमनगर, रबाळे आणि विद्याभवन स्कुल, नेरुळ या शाळांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai