Breaking News
नवी मुंबई : कोपरखैरणे, घणसोली भागांत शाळा सुटण्याच्या वेळेस सर्वच शाळांसमोर रस्त्यावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. या विभागांतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व इतर पदाधिकारी यांची बैठक घेऊन या समस्येवर कसा मार्ग काढता येईल यावर चर्चा केली. अनेक उपाय सूचवून याचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
लोकसंख्येची सर्वाधिक घनता असणारा कोपरखैरणे आणि घणसोली येथे शाळा सुटण्याच्या वेळेस बहुतांश शाळांच्या परिसरांत प्रचंड वाहतूक कोंडी होते. अनेक पालक चारचाकी-दुचाकींचा आणतात. त्याचबरोबर शाळेच्या बसदेखील शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत थांबतात. चिंचोळे रस्ते, त्यात दोन्ही बाजूला वाहने उभी केल्यामुळे शाळांच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी प्रत्येक शाळेसमोर वाहतूक पोलीसच तैनात करण्यात आले होते. मात्र वाहतूक पोलिसांनी कितीही समजावून सांगितले तरी पालक दोनच मिनिटे म्हणत बेशिस्तपणे दुचाकी, कार उभी करतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांची तारांबळ उडते.
कोपरखैरणे वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी पुढाकार घेत सोमवारी कोपरखैरणे येथील सेंट मेरी शाळेत कोपरखैरणे, घणसोली भागांतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व इतर पदाधिकारी यांची बैठक घेतली. शाळा सुटताना व भरताना होणारी वाहतूक कोंडी यावर कसा मार्ग काढता येईल याविषयी चर्चा करून त्यानंतर शाळेच्या वाहतूक संदर्भातील अडचणींवर कसा मार्ग काढता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. सर्वांनी वाहतुकीचे नियम कसे पाळावेत याबाबत प्रबोधन केले. या वेळी 38 शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच स्कूल बस, स्कूल व्हॅन युनियनचे पदाधिकारी हेदेखील उपस्थित होते. पालकांनी कसे वाहन उभे करावे, बस कशा पद्धतीने उभ्या कराव्यात जेणेकरून अन्य वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, शालेय वर्ग टप्प्याटप्प्याने सोडावे, शाळा प्रशासनातर्फे काही स्वयंसेवकांची नेमणूक शाळेचे पालक आणि बस चालकांशी समन्वय साधत वाहतूक नियंत्रित करावी असे अनेक उपाय यावेळी सुचवण्यात आले, अशी माहिती भिंगारदिवे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai