Breaking News
पालिका आयुक्तांचे आवाहन; 10 दिवस आधी मंडळांनी परवानगी घ्यावी
नवी मुंबई ः पर्यावरणाचे संरक्षण करणे हे सर्वांचे प्रथम कर्तव्य असून यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असा प्लास्टिकमुक्त साजरा करावा अशी मनोमन ठाम प्रतिज्ञा करण्याचे आवाहन करीत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींचा वापर टाळून शाडूच्या मूर्तींची स्थापना करावी तसेच मूर्तींची उंचीही मर्यादित राखावी आणि विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करून नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण करावे असे आवाहन केले. तसेच गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे आयुक्तांनी केले जाहीर
7 सप्टेंबर पासून सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असून या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस व संबंधित प्राधिकरणे यांची श्रीगणेशोत्सव मंडळांसमवेत पूर्वतयारी नियोजन बैठक महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी पालिका अधिकाऱ्यांसह इतर विभागप्रमुख तसेच पोलीस अधिकारी, विभाग अधिकारी आणि इतर प्राधिकरणांचे अधिकारी व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना उत्सव सुनियोजित पध्दतीने साजरा व्हावा याकरिता सूचना करण्याचे सूचित केले. त्यानुसार गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व त्यानंतर पोलीस, महापालिकेचे अधिकारी यांचेकडूनही त्यांची मते व सूचना जाणून घेण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पाळावयाच्या नियमांची माहिती दिली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारणेकरीता “ई-सेवा संगणक प्रणाली” उपयोगात आणण्याचे आवाहन करण्यात आले. उत्सवाच्या 10 दिवस आधी मंडळांनी ऑनलाईन परवानगी प्राप्त करून घ्यावी असे पालिकेमार्फत सूचित करण्यात आले. या परवानगीसाठी पालिकेमार्फत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे आयुक्तांनी जाहीर केले. या निर्णयाचे सर्व गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले. मंडप परवानगीसाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे इतर प्राधिकरणांकडून उपलब्ध करून घेताना सिडकोमार्फत जागेची परवानगी मिळण्यात तसेच एमएसईडीसीएल यांच्याकडून वीजपुरवठा मीटर उपलब्ध करून देण्यात व गणेशोत्सवानंतर अनामत रक्कम परत देण्यात होणारा विलंब टाळावा अशी सूचना गणेशोत्सव मंडळांमार्फत करण्यात आली. त्यानुसार या प्राधिकरणांस सूचना करण्यात येतील असे आयुक्तांनी सांगितले. गणेशोत्सवापूर्वी ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत त्यांची तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनस्थळी पुरविण्यात येणाऱ्या सर्व सुविधा पूर्वापार पध्दतीने पुरवाव्यात व यामध्ये आवश्यक वाढ आत्ताच करून घ्यावी असेही विभाग अधिकाऱ्यांकडून व कार्यकारी अभियंत्यांकडून सुविधांचा आढावा घेताना आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी निश्चय करून शाडूच्या गणेशमूर्तीच आणाव्यात असेही आवाहन आयुक्तांनी केले. याशिवाय मूर्तींची उंची मर्यादित ठेवण्यासाठी आपणहून स्वयंस्फुर्तीने पुढाकार घ्यावा. महत्वाचे म्हणजे पर्यावरणाला सर्वात मोठा धोका प्लास्टिक आणि थर्माकोलचा असून सजावटीत तसेच कोणत्याही गोष्टीत प्लास्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळून पर्यावरणशील ‘प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव' साजरा करण्याची प्रतिज्ञा करूया असे आवाहन आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai