Breaking News
ऑनलाइन अर्ज भरेना : पालिकेत जमा अर्जाबाबत माहिती मिळेना
नवी मुंबई : शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद लाभला असून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातूनही अनेक महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. परंतु मुदत वाढवूनही नवीन अर्ज ऑनलाईन स्वीकारला जात नसून महापालिकेत जमा केलेल्या अर्जाविषयीही ठोस माहिती मिळत नाही. त्यामुळे अर्ज सरकार दप्तरी जमा होऊन या योजनेचा लाभ मिळणार का? याबाबत शहरातील महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्र्यांकडून अनेक योजनांना मंजुरी मिळत आहे. जुलैमध्ये लाडकी बहीण योजना कार्यान्वित झाल्यानंतर राज्यभरातील महिलांकडून या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातूनही अनेक महिलांनी यासाठी ऑनलाईन अर्ज केले. ज्या महिलांना काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज करता येणे शक्य होत नाही अशा महिलांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने ठिकठिकाणी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरू केले. त्यामुळे महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात अर्ज जमा झाले आहेत. परंतु अनेक दिवस लोटल्यानंतरही महापालिकेकडून महिलांना ओटीपीसाठी विचारणा होत नाही. नारीशक्ती ॲपवरून नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत. तसेच शासनाची वेबसाईट ही व्यवस्थित कार्यान्वित होत नाही, अशा सर्व कारणांमुळे अर्ज शासनदरबारी जमाच होत नसल्याने या योजनेचा लाभ मिळणार नसल्याची भावना अनेक महिलांमध्ये निर्माण झाली आहे.
योजना जाहीर केल्यानंतर सुरुवातीला जमा झालेल्या अर्जांव्यतिरिक्त नवीन ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे या योजनेबाबत साशंकता निर्माण होत आहे. जमा अर्जांची पडताळणी योग्य पद्धतीने होते का नाही याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. - साक्षी शिंदे, गृहिणी, घणसोली
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai