Breaking News
नवी मुंबई ः आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते सुव्यवस्थित असावेत यादृष्टीने पावसाळी कालावधीत खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम पालितेने युध्द पातळीवर हाती घेतले आहे. आयुक्तांनी याकामी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश आढावा बैठकीमध्ये दिले आहेत.
आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सर्व अभियंत्यांची बैठक घेत रस्ते सुधारणेच्या कार्यवाहीस तातडीने सुरुवात केली आहे. स्वत: शहर अभियंता सर्व विभागांत व प्रत्येक विभागातील कार्यकारी अभियंता आपापल्या विभागातील खड्डे दुरुस्ती कामांची पाहणी करीत आहेत. सध्या पावसाने काहीशी उघडीप दिली असल्याने शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते यासह एमआयडीसी भागातील रस्ते दुरुस्ती करण्यात येत आहे. यामध्ये रस्त्याच्या स्वरुपानुसार मास्टिक, कोल्डमिक्स व अस्फाल्ट याचा वापर करण्यात येत असून खड्डे दुरुस्ती करताना शास्त्रीय पध्दतीचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत व त्याकडे लक्ष ठेवले जात आहे. खड्डे दुरुस्ती करताना रस्त्याची मूळ पातळी व खड्डयामध्ये भरलेले साहित्य यांची पातळी समान राहील व त्यांची जुळणी व्यवस्थित होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे खड्डे दुरुस्ती केलेल्या जागेवर पुन्हा खड्डा पडू नये अशाप्रकारे दुरुस्ती करण्यात यावी असेही निर्देशित करण्यात आलेले आहे. मुख्य रस्त्यांप्रमाणेच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीवरही भर देण्यात येत असून श्री गणेशमूर्तींच्या आगमन, विसर्जनाच्या मिरवणुका तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आसपासचा परिसर येथील आणि इतर अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
नवी मुंबई शहरातील रस्ते सुस्थितीत राहतील याकडे अभियांत्रिकी विभागाने काटेकोर लक्ष दयावे आणि 15 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर याबाबत विशेष काळजी घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले असून त्यास अनुसरुन अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण अभियांत्रिकी विभाग शहरातील रस्ते सुधारण्यासाठी अधिक सतर्कतेने काम करीत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai