Breaking News
नवी मुंबई : झाडांवर जाहीराती, पोस्टरसाठी खिळे ठोकणाऱ्यांना व रोषणाई करणाऱ्यांना ते सात दिवसांत काढून न टाकल्यास कारवाईचा इशारा पालिकेने दिला होता. त्यानुसार झाडांचे विद्रुपीकरण करणाऱ्या 40 जणांना आतापर्यंत नोटीस पाठवण्यात आल्या असून तीन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात अनेक ठिकाणी विषेशत: बाजार ठिकाणी असणारे दुकानदार दुकानासमोरील झाडाला खिळे ठोकून दुकानाचे नाव आणि दिशा दाखवणारा बाण, विशेष सूट असे फलक लावतात. याबाबत पर्यावरण प्रेमी नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याची आतापर्यंत दखल घेतली जात नव्हती. यंदा मात्र मनपा आयुक्तांनी याची दखल घेतली असून झाडांवर खिळे ठोकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या दोन महिन्यांत अशा 40 पेक्षा अधिक लोकांना नोटीसा बजावल्या आहेत तर तीन जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
झाडांवर विद्युत रोषणाई करणे आणि त्यावर खिळे ठोकून जाहिराती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान ज्यांनी अशाप्रकारे जाहिरातबाजी केली आहे त्यांनी सात दिवसांमध्ये या जाहिराती काढून टाकाव्यात अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai