Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने लोकनेते आमदार गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद उपक्रमाचे आयोजन वाशी येथे करण्यात आले होते. या जनसंवाद उपक्रमात दशरथ भगत यांच्या अध्यक्षतेखाली गणेश नाईक यांचा जनगौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचे कर्तृत्व व अनुभवाचा सन्मान याठिकाणी करण्यात आला.
वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुसंवादातून सुसंस्कृत विकास आणि सन्मान या शीर्षकाअंतर्गत पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये वाशी येथील 65, 77 आणि 78 या तिन्ही प्रभागांमधील नागरिकांनी विविध प्रलंबित कामे याविषयीची तसेच विविध सामाजिक संघटनांनी निवेदने सादर केली. ही निवेदने संबंधित विभागाकडे पाठवून त्याची निश्चितपणे सोडवणूक करण्याची ग्वाही आमदार नाईक यांनी दिली.
विकसित नवी मुंबई घडविणारे आ. गणेश नाईक यांचा जनतेच्या वतीने भव्य नागरी सत्कार यावेळी पार पडला. या कार्यक्रमास नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक, नवी मुंबई; पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, युवा नेते निशांत भगत, समाजसेवक संदीप भगत, माजी नगरसेविका फशीबाई भगत, अंजली वाळुंज, माजी नगरसेवक घनश्याम मढवी, राजेश शिंदे, भरत नाईक आणि 20 पेक्षा अधिक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला व त्यांस सन्मानपूर्वक छत्र्यांची भेट देण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना युवा नेते निशांत भगत यांनी आमदार नाईक नवी मुंबईची काळजी वाहणारे एकमेव नेतृत्व असल्याचे सांगितले. तर संदीप नाईक यांचे नेतृत्व भविष्यवेधी असून; शिक्षण व्हिजन, आरोग्य व्हिजन, उद्यान व्हिजन, तलाव व्हिजन यासारख्या धोरणाअंतर्गत त्यांनी विकास कामे उभी केल्याचे नमूद केले.
भविष्यात देखील गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास होत असताना जल, जंगल आणि जमीन यामुळे विस्थापित झालेल्याना न्याय मिळून त्यांचे पुनर्वसन होण्यासाठी आपणास गणेश नाईक यांच्या नेतृत्वा खाली चळवळ उभी करायची असल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले. स्थानिक, प्रकल्पग्रस्त, मच्छिमार यांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या. या घटकांसाठी गृह योजनांमधून तसेच भूखंड योजनांमध्ये 50 टक्के घरे राखीव ठेवण्याची मागणी दशरथ भगत यांनी यावेळी केली.
संदीप नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्थानिक, प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र, मच्छीमार अशा सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेच्या कार्याचा गौरव केला.आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या विकासाचे श्रेय येथील सुजान जनतेला देत आपण मात्र निमित्त असल्याचे सांगितले. पुढील 20 वर्षे देखील कोणतीही करवाढ होऊ देणार नाही असा शब्द त्यांनी दिला. प्रकल्पग्रस्तांची, एलआयजीची आजपर्यंतची सर्व गरजेपोटीची बांधकामे मालकी हक्कासह नियमित करावीत. झोपडीधारकांची आजपर्यंतची सर्व घरे मालकी हक्काने नियमित करावीत. या घटकांना त्यांच्या इच्छेनुसार हवी असलेली योजना राबवावी, अशी भूमिका असल्याचेही आ. गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai