Breaking News
मुख्यमंत्री शिंदे यांचे पाहणी दौऱ्यात आश्वासन
पनवेल : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेल येथे केले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनाची अंमलबजावणी होते की ते हवेत विरते हे पाहणे महत्वाचे आहे असा सूर कोकणवासियांनी आवळला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 26 ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील सुरु असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली. पनवेल पळस्पे येथून मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगांव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. पहिली टेक्नॉलॉजी एम-60 आरएफसी आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम-60 पध्दत आणि तिसरी डीएलसी पध्दत या तीन आधुनिक पध्दतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट एम-60 या पध्दतीचाही उपयोग करण्यात येत आहे. या पध्दतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेटस बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच महामार्गाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पध्दतीने कुठे काम करायचे, ते आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरु आहे. जरी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले. तब्बल 155 किलोमीटर रस्त्याच्या पाहणीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पळस्पे, गडब, कोलाड, माणगांव, लोणेरे फाटा आणि कशेडी बोगदा या ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची भर पावसात पाहणी केली. शेवटी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी या महामार्गावरील रस्त्यांची राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी निर्देश दिले. दरम्यान, सदर पाहणी दरम्यान रायगड प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याविषयीचे निवेदन दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai