Breaking News
नवी मुंबई ः दिवसेंदिवस प्रत्येक सण साजरे करण्याचे स्वरुप बदलताना पाहायला मिळत आहे. दहीहंडी उत्सवातही अनेक बदल झाले असून त्याला व्यावसायिक, राजकीय स्वरुप आले आहे. लाखोंचे लोणी या यात खर्च केले जाते. डिजेच्या तालावर तरुणाईचा धांगडधिंगा शहरी भागात सुरु असला तरी नवी मुंबईतील मुळ गावातून मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीनेच दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात साजरा झालेला पाहायला मिळाला.
साहसी खेळ असणाऱ्या दहीहंडीसाठी गोविंदांची पथके महिनाभरापासूनच तयारीला लागतात. राजकीय पक्षांकडून मानाच्या हंड्याचे आयोजन केले जाते. यामध्ये लाखोंची बक्षिसे वितरीत केली जातात. डिजेच्या तालावर नृत्य, गाणी, आरक्रेष्टा, सिनेसृष्टी कलाकारांची मांदियाळी आणि त्यासाठी जमलेली गर्दी यांचा जल्लोष शहरातील रस्त्यांवर पाहायला मिळतो. चौकाचौकात उंच उंच मनोरे रचले जातात. नवी मुंबईतही वाशी, सानपाडा, ऐरोली, घणसोली येथे काही मानाच्या हंड्या पाहण्यासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली. एकुणच गजबजलेल्या, जल्लोषपुर्ण वातावरण शहरी भागात पाहायला मिळाली. तर दुसरीकडे नवी मुंबईतील मुळ गावात दहीहंडीचा सण आजही तितक्याच जोशाने आणि पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला.
शिरवणे गावात तर मागील 50 हुन अधिक वर्षापासून पासून डोक्याने दहीहंडी फोडली जाते. काही उंचीवर दहीहंडी बांधली जाते, त्यानंतर गोविंदा पळत पळत उंच उडी घेत डोक्याने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतो. शिरवणे गावातील मानाची दहीहंडी म्हणून आजही सदर दहीहंडी प्रचलित आहे. आग्रोळी ;गावातील पारंपरिक दहीहंडी उत्सवात हंडी फोडणाऱ्या गोविंदाला फेकून डोक्याने हंडी फोडण्याची प्रथा आहे. काहीशा उंचीवर दहीहंडी बांधून मग गावातील तरुणाई ज्याला हंडी फोडायची आहे, त्याला दहीहंडीच्या दिशेने हलकेसे फेकून देतात आणि त्यानंतर त्या गोविदाने नेम धरत डोक्याने हंडी फोडायची असते. दिवाळे गावात देखील गावकीची जुनी दहीहंडी देवळात फोडली जाते. तर दुसरी हंडी पळत पळत जावून डोक्याने फोडली जाते. नवी मुंबई शहर जरी स्मार्ट सिटी म्हणून जरी ओळखले जात असले तरी इथल्या स्थानिक भूमीपुत्रांच्या सणावारांची प्रथा आजही रुढी परंपरेला धरुनच सुरुच आहेत.
आगरी-कोळी समाजाकडून आजही सर्वच सणवार मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. एक गांव एक दहीहंडी अशी प्रथा सर्वच गावात पाळली जाते. कोणी बोली दही हंडी लिलाव पध्दतीने साजरे करतात, तर कोणी चोर हंडी, डोळ्याला पट्टी बांधून तर कोणी डोक्याने हंडी फोडतात. सर्वात आधी गावकीच्या बोली दही हंडीची सुरुवात गावातील मंदिरातून केली जाते. 1 हजार रुपयापासून सुरु होणारी बोली एक-दीड लाखावर थांबली जाते. त्यानंतर बोली जिंकल्यानंतरच जो काही पैसा असतो तो गावकी धार्मिक कार्यासाठी खर्च करतात. घणसोली गावात बोली दहीहंडीची परंपरा नसली तरी गावातील सहा आळ्या एकत्रित येऊन गोकुळ अष्टमीचा उत्सव साजरा करतात. यंदा या उत्सवाचे 123 वे वर्ष असून यावेळी गावातील पाटील आळीला गावकीची मानाची हंडी फोडण्याचा मान मिळाला आला. याशिवाय कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, पावणे, आदि गावांमध्ये बोली दहीहंडीची चुरस पहायला मिळाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai