Breaking News
बांधकाम ठिकाणांवरील ध्वनी, वायू प्रदूषण व ब्लास्टींगकरिता खबरदारी
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी बांधकाम व पुनर्विकासाची कामे सुरु आहेत. या कामांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टिंगच्या अनुषंगाने नागरिकांकडून व लोकप्रतिनिधींकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असतात. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पालिकेने बांधकामांच्या ठिकाणी ‘मानक कार्यप्रणाली' जारी केली आहे.
‘मानक कार्यप्रणाली' तयार करण्याकरिता नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या दि. 24/04/2024 रोजीच्या आदेशान्वये नवी मुंबई पालिका स्तरावर अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ सदस्यांची समिती गठित करण्यात आलेली होती. सदर समितीने विविध बैठका घेऊन तयार केलेल्या नवी मुंबई पालिका क्षेत्रातील बांधकाम परवानगी धारकांनी/विकासकांनी/ कंत्राटदारानी अवलंबण्याच्या वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण व एकापेक्षा जास्त खोलीच्या बेसमेंटबाबत उत्खनन/ब्लास्टिंग करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत मानक कार्यप्रणाली तसेच बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणाऱ्या वायू व ध्वनीप्रदूषण विषयक दंडात्मक कारवाईबाबतच्या प्रस्तावास महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी दि. 26/07/2024 रोजी, ठराव क्र. 6452 अन्वये मंजूरी दिलेली आहे.
त्या अनुषंगाने नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टींगकरिता अवलंबवयाची ‘मानक कार्यप्रणाली आणि बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणाऱ्या वायू व ध्वनीप्रदूषण दंडात्मक कारवाईबाबतचे परिपत्रक तयार करण्यात आले असून त्यास आयुक्त महोदयांनी 01 ऑगस्ट 2024 रोजी मान्यता प्रदान केलेली आहे.
या परिपत्रकानुसार सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पावर नियंत्रण करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या परिपत्रकान्वये स्थानिक विभाग अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ज्या ठिकाणी खोदकाम / बांधकाम सुरु आहे, अशा सर्व प्रकल्पांच्या ठिकाणी जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक आठवडयातून किमान एकदा प्रत्यक्ष पहाणी करुन तसा अद्ययावत अहवाल सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांचेकडे सादर करावयाचा आहे.
या बांधकाम प्रकल्पांमध्ये संबंधितांकडून अटी व शर्तीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास आयुक्त यांच्या पूर्व परवानगीने सदर बांधकाम परवानगी धारकाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बांधकाम प्रकल्पांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणास आळा घालण्यासाठी त्याचप्रमाणे खोदकाम / ब्लास्टिंगमुळे नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टीकोनातून तसेच प्रकल्पांच्या ठिकाणी होणाऱ्या संभव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेकडून कठोर पावले उचलली जात आहेत. याबाबत नवी मुंबई पालिकेमार्फत जारी करण्यात आलेले सविस्तर परिपत्रक नवी मुंबई पालिकेच्या संकेतस्थळावर माहितीसाठी उपलब्ध आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai