Breaking News
प्लास्टर कोसळले; धोकादायक पाईप हटविण्याची मागणी
मुंबईच्या गर्दीला पर्याय म्हणून सिडकोने सुमारे 54 वर्षांपूर्वी म्हणजे सन 1970 पासून नवी मुंबई शहर वसविण्यास सुरुवात केली. नियोजनबद्ध शहर तयार करताना रस्ते, पाणी, नागरी वस्त्या तसेच मलनिःसारण वाहिन्या अशा अनेक महत्वाच्या बाबींकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. शहरातून मल:निस्सारण वाहिन्या टाकताना त्यामधून निघणारा गॅस ठराविक उंचीवर हवेत विसर्जित व्हावा याकरिता ठिकठिकाणी सिमेंट काँक्रीटचे गॅस वेंट पाईप उभे करण्यात आले. सध्या निष्क्रिय असणाऱ्या या वेंट पाईपची अनेक वर्षांपासून डागडुजी न झाल्याने प्रचंड दूरवस्था झाली आहे. या सिमेंट काँक्रीटच्या स्तंभावरील प्लास्टर पडलेले असून आतील गंजलेल्या लोखंडी सळ्या उघड्यावर दिसत आहेत. त्यामुळे हे गॅस वेंट पाईप कधीही कोसळण्याची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. हे गॅस वेट पाईप पडल्यास नजीकच्या वाहनांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तसेच या ठिकाणाहून पादचाऱ्यांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे जीवितहानीचीही शक्यता नाकारता येत नाही. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे वेट पाईप लवकरात लवकर हटवण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
मल:निस्सारण वाहिन्यांवरील सिमेंट काँक्रीटचे गॅस वेंट पाईप जीर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले असून ते लवकरात लवकर पाडण्यात येतील. तसेच त्याठिकाणी योग्य त्या पर्यायी उपाययोजना केल्या जातील. - संतोष चौधरी, उपअभियंता, स्थापत्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका
धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते त्या प्रमाणे या सिमेंट काँक्रीटच्या गॅस स्तंभांचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट केले जावे व त्या ठिकाणी योग्य पर्यायी उपाययोजना केली जावी. - हिरा चोरट, नागरिक, कोपखैरणे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे