Breaking News
नवी मुंबई ः स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणाला व मानवी जीवनाला घातक असणा-या प्लास्टिकपासून सर्वांना वाचविण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत असून ''प्लास्टिकमुक्त सोसायटी'' अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत बेलापूर येथील मरमेंट सोसायटी याठिकाणी स्वच्छतेसोबतच प्लास्टिकमुक्त सोसायटी विषयी जनजागृती करण्यात आली व तेथील रहिवाश्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल यांच्या पुढाकारातून स्वच्छता अधिकारी श्री. सूर्यकांत म्हात्रे यांच्या सहयोगाने सेक्टर 38 नेरूळ येथील केंद्रीय विहार सोसायटी, सेक्टर 44 नेरूळ येथील गिरीराज सोसायटी व सेक्टर 11 सीबीडी बेलापूर येथील मरमेंट सोसायटी याठिकाणी स्वच्छतेसोबतच प्लास्टिकमुक्त सोसायटी विषयी जनजागृती करण्यात आली व तेथील रहिवाश्यांना प्रोत्साहित करण्यात आले. येथे कचरा वर्गीकरण, कचरा प्रक्रिया प्रकल्प, थ्री आर चे महत्व, प्लास्टिकचे दुष्परिणाम याविषयी माहिती देऊन जागरूकता निर्माण करण्यात आली तसेच सूर्योदय बँकेच्या सीएसआर सहकार्यातून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मी प्लास्टिक पिशव्या व एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर करणार नाही अशी सामुहिक शपथही ग्रहण करण्यात आली.
यावर्षीचा गणेशोत्सव प्लास्टिकमुक्त साजरा करणेविषयी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यापूर्वीच आवाहन केले असून याबाबतही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai