Breaking News
नवी मुंबई ः‘स्वच्छ भारत मिशनच्या वतीने स्वच्छता ही सेवा पंधरवडा जाहीर करण्यात आला आहे. पालिकेच्या वतीने 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा शुभारंभ वाशी सेक्टर 6 येथे जागृतेश्वर तलाव परिसर सखोल स्वच्छता मोहीमेव्दारे संपन्न झाला. यावेळी 600 हून अधिक नागरिकांनी एकत्र येत ही स्वच्छता मोहिम यशस्वी केली.
अनंत चतुर्दशीदिनी मोठया प्रमाणावर श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. अगदी पहाटेपर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता. या अनुषंगाने विसर्जनस्थळ परिसराच्या स्वच्छतेपासून स्वच्छता ही सेवा अभियानाला प्रारंभ करावा या भूमिकेतून आयुक्त महोदयांच्या संकल्पनेमधून वाशी जागृतेश्वर तलाव परिसराची सखोल स्वच्छता करीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये 600 हून अधिक अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी सहभागी होत हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. यामध्ये नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे, माजी आमदार संदीप नाईक, स्वच्छ महाराष्ट्र मिशनचे राज्य संचालक नवनाथ वाठ व उपआयुक्त मल्लिकार्जुन पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शिरीष आरदवाड तसेच महानगरपालिकेचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छ नवी मुंबई मिशनच्या वुमन आयकॉन रिचा समित व युथ आयकॉन नामांकित जलतरणपटू शुभम वनमाळी त्याचप्रमाणे विविध स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, एनएसएसचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात 2 ऑक्टोबरपर्यंत दररोज स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिली. यामध्ये - रेल्वे स्टेशन स्वच्छता, हायवे स्वच्छता, मॅनग्रुव्हज स्वच्छता, शाळा रुग्णालये व कार्यालये स्वच्छता त्याचप्रमाणे आशियातील सर्वात मोठ्या एपीएमसी मार्केटमध्ये व्यापक स्वरूपात सखोल स्वच्छता मोहीम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय जुने कपडे व ई-कचरा दान, वक्तृत्व, घोषवाक्य, कॅनव्हास पेंटिंग, प्रश्नमंजुषा, निबंध, रांगोळी, स्वच्छता दौड, सायकल रॅली अशा अनेक उपक्रमांचेही आयोजन करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
यावेळी स्वच्छता ही सेवा मोहीमेचा प्रचार करण्यासाठी सजवलेल्या एनएमएमटी बसेसमधील प्रातिनिधिक स्वरूपातील एका बसला झेंडा दाखवून अभियान प्रसिध्दी मोहीमेचाही आरंभ करण्यात आला. तसेच स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात आली. वाशी येथील जागृतेश्वर तलाव परिसर सखोल स्वच्छता मोहीमेप्रमाणेच नमुंमपा क्षेत्रात विविध विभागांतील विसर्जन तलावांच्या परिसरातही संबंधित विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विशेष स्वच्छता मोहीमा राबवून विसर्जन स्थळ परिसर स्वच्छ करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai