Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिकेने सर्व विसर्जनस्थळी केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये अनंतचतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. 22 नैसर्गिक व 137 कृत्रिम विसर्जनस्थळी उत्सवाच्या दहाव्या दिवशी 7846 घरगुती व 589 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 8435 श्रीगणेशमूर्तींचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये 896 शाडूच्या श्रीमूर्तींचा समावेश होता.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बनविण्यात आलेल्या मोठ्या व्यासपीठावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणाऱ्या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करीत श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप दिला तसेच श्रीगणेशभक्तांचे स्वागत केले. पालिकेच्या वतीने सर्वच विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवांच्या आकाराने मोठ्या मूर्तींचे विसर्जन होणार असल्याने सर्व विसर्जन स्थळांवर अधिक सक्षम व्यवस्था ठेवण्यात आली होती. यामध्ये 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात स्वयंसेवक व लाईफगार्ड्स तसेच अग्निशमन दलाचे जवान कार्यरत होते. पोलीस यंत्रणा सर्व विसर्जन स्थळे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज होती. सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सी.सी.टी.व्ही. लावण्यात आले होते. श्रीमूर्ती विसर्जनाकरिता विसर्जनस्थळी मध्यम व मोठ्या तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात अशा विसर्जन स्थळांवर फोर्कलिफ्ट / क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.
विसर्जन स्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबूचे बॅरेकेटींग करण्यात आले होते व विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी व प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. भक्तजनांना श्रीमूर्तींची निरोपाची आरती व सांगता पूजा करता यावी यादृष्टीने विसर्जनस्थळी टेबलची व्यवस्थित मांडणी करण्यात आली होती. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जन स्थळांवर तसेच परिमंडळ 1 च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे सूचना व स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही त्यांना आवश्यक सूचना देणे व गर्दीचे नियोजन करणे शक्य झाले. ‘सुके निर्माल्य” टाकण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. या निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. हे निर्माल्य पालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेण्यात आले. त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.
नमुंमपा क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 6381 घरगुती तसेच 578 सार्वजनिक मंडळांच्या 6959 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 137 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1465 घरगुती तसेच 11 सार्वजनिक मंडळांच्या 1476 श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 7846 घरगुती व 589 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 8435 श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन दहाव्या दिवशी सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 896 श्रीगणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai