Breaking News
36 हजार 573 कोटींची गुंतवणूक
नवी मुंबई : नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत राज्यातील पहिल्या सुमारे 12 हजार कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या आरआरपी इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक कंपनीचा हा प्रकल्प आहे. यातून राज्यात 2 टप्प्यांत मिळून तब्बल 36 हजार 573 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. शिवाय लाखो रोजगार उपलब्ध होणार आहेत.
सेमी कंडक्टर चीप हा प्रकल्प आरआरपी ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यामार्फत हा उभा करण्यात येत आहे.हा मराठी उद्योजकाचा महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं बनवणारा अग्रगण्य समूह आहे. दोन टप्यात हा प्रकल्प होणार असून इटली आणि फ्रान्स सरकारचा यामध्ये 27% वाटा आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 24 हजार 538 कोटी एवढी गुंवतणूक करण्यात येणार आहे. दोन्ही टप्यातील घटकाची महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक 36 हजार 573 कोटी एवढी असणार आहे. राज्यात उद्योग क्षेत्राला कॅपिटल सबसिडी आहे. रेड कार्पेट सुविधा आहेत. एक खिडकी योजना असल्यामुळे उद्योग क्षेत्र विकसित होत आहे. एमएमआर क्षेत्रच नव्हे तर गडचिरोली सारख्या भागातही औद्योगिक क्षेत्र विस्तारत असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच राज्यात उद्योग वाढावेत, यादृष्टीने उद्योजकांना सबसिडीसह विविध सवलती आणि सुविधा प्रदान केल्या जात आहेत. त्यामुळे उद्योजकांना कोणीही त्रास दिल्यास त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग व्हायचा असेल तर ही चीप इंडस्ट्री भारतात असावीच लागेल. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी स्वतःची इको सिस्टम तयार केली. आज इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल सिस्टम आपल्या जीवनाला बदलतेय. एआय मुळे आपली क्षमता बदलली आहे. डीजीटल वर्ल्ड आणि एआय आपले जीवन बदलते आहे. त्यामुळे अग्रभागी राहायचे तर ही टेक्नॉलॉजी वापरावी लागेल. भारताने डिझाईन क्षेत्र काबीज केलं आहे त्याला सपोर्ट करणारे तंत्रज्ञान आहे. सेमी कंडक्टर क्षेत्र हे ही सस्टेनेबल नसल्याचं म्हटलं जातं मात्र आज सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पात पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला हातभार लागणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. 12 हजार कोटींची गुंतवणुक असलेल्या या प्रकल्पातून 4 हजार रोजगार निर्मिती होईल. महाराष्ट्र देशासाठी नेतृत्व करेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
हा संपूर्ण प्रकल्प 36 हजार कोटींचा असणार आहे. तसेच याच क्षेत्रात 83 हजार कोटींची गुंतवणूक असलेली टॉवर्स नावाची कंपनी आपला उद्योग सुरू करणार आहे. एकूणच येत्या काळात नवी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार असून, त्यामुळे लाखो रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai