Breaking News
नवी मुंबई : उद्योग आणि शासन या त्रिसूत्रीचे सांगड घालून बाष्पके उद्योगाला चालना देण्यासोबतच बाष्पकांचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर कसा करता येईल या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने दि. 25, 26 आणि 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे जागतिक स्तरावरील “बॉयरल इंडिया 2024” प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
“बॉयरल इंडिया 2024” या प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी 10.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, येथे होणार असून, या कार्यक्रमास राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच शासकीय अधिकारी आणि उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनामध्ये बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर या प्रणालीचे लोकार्पण होणार आहे. प्रणालीमुळे बाष्पके उद्योगांमध्ये बाष्पक व त्याच्या सुट्या भागाच्या निर्मितीची प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीने आता उत्पादनातील प्रत्येक टप्प्याचे संपूर्ण दस्तऐवजीकरण एका प्लॅटफॉर्मवर सहजपणे करण्यात येईल, ज्यामुळे उत्पादक आणि नियामक यांच्यातील समन्वय अधिक चांगला होईल. सॉफ्टवेअरमुळे बॉयलर निर्मितीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल आणि संबंधित कागदपत्रांमध्ये सुलभता येईल. हे सॉफ्टवेअर केवळ औद्योगिक कार्यक्षमता वाढवणार नाही, तर कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरेल. अशी माहिती बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर यांनी दिली आहे.
या प्रदर्शनात बाष्पके (बॉयलर) संबंधीत विविध यंत्रे, साहित्य मांडण्यात येणार आहेत. याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, घडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन तीन दिवस चालणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. हे चर्चासत्र व प्रदर्शन कामगार सुरक्षेला प्रोत्साहन देणारे आहे व बाष्पकांच्या सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावा हे सुनिश्चित करण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ ठरेल. या चर्चासत्र व प्रदर्शनीमध्ये उद्योगातील अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाय, नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने औद्योगिक कार्यक्षमता वाढवणे आणि पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी हरित उपाययोजना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. हा उपक्रम उद्योगांना सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आणि कार्यक्षमता वाढवण्यात मदत करेल. बाष्पकांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावा, बाष्पक, हीट एक्सचेन्जर, प्रेशर व्हेसल्स निर्मितीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे, बाष्पके (बॉयलर) क्षेत्रात होणारे बदल, या क्षेत्रासंबंधीची माहिती प्रदर्शन, चर्चासत्र आणि कार्यशाळेच्या माध्यामांतून कौशल्य विकास व रोजगारांची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त उद्योजक आणि नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai