Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशन्समध्ये सखोल स्वच्छता मोहीमा व्यापक लोकसहभागातून आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आल्या. यामध्ये 2600 हून अधिक एनएसएस व एनसीसीचे विद्यार्थी, स्थानिक सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य तसेच पर्यावरण प्रेमी नागरिक यांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि महानगरपालिकेचे व रेल्वे परिसरातील सिडकोचे स्वच्छताकर्मी यांच्यासह सहभागी होत नेहमीच वर्दळ असणाऱ्या रेल्वे स्टेशनमधील अंतर्गत पॅसेज तसेच बाहेरील वाहनतळ व इतर दुर्लक्षित जागा यांची सखोल स्वच्छता केली. प्लास्टिक, कापड, थर्माकोल, कागद यांचा कचरा संकलित करण्यात आला.
बेलापूर रेल्वे स्टेशन याठिकाणी सहा.आयुक्त शशिकांत तांडेल व स्वच्छता अधिकारी श्री.सूर्यकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत विद्या उत्कर्ष मंडळ महाविद्यालयाचे एनएसएस विद्यार्थी तसेच संकल्प वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य आणि नागरिक यांनी सहभागी होत 100 गोणी कचरा संकलित केला. नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात स्टर्लीग कॉलेजच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी उत्साहाने नागरिकांसह स्वच्छता मोहीम राबविली. सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे, स्वच्छता अधिकारी अरूण पाटील यांच्या नियंत्रणाखाली याठिकाणी 125 गोणी कचरा गोळा करण्यात आला.
वाशी रेल्वे स्टेशन व परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत 250 हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत साधारणत: 940 किलो कचरा संकलित केला. वाशी विभागाचे सहा.आयुक्त सागर मोरे, मुख्य स्वच्छता अधिकारी सतीश सनदी, स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या या रेल्वे स्टेशन स्वच्छता मोहीमेत से.8 येथील टिळक कॉलेजचे आणि से 10 येथील झुनझुनवाला कॉलेजचे एनएसएस विद्यार्थी तसेच विविध संस्थांच्या सदस्य आणि स्वच्छता प्रेमी नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. तुर्भे रेल्वे स्टेशन व परिसरात सहा.आयुक्त भरत धांडे व स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली महाविद्यालयीन एनएसएस विद्यार्थी आणि नागरिकांनी स्वच्छता मोहीमेत सहभागी होत स्टेशन परिसर स्वच्छ केला. कोपरखैरणे रेल्वे स्टेशन व परिसर सेक्टर 19 येथील सहा.आयुक्त सुनिल काठोळे. स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली विद्यार्थी व नागरिकांनी उत्साहाने मोहीम राबवत स्वच्छ केला. या मोहीमेमध्ये लोकमान्य टिळक कॉलेज से.4 यांचे 150 हून अधिक एनएसएस विद्यार्थी, डिव्हीएस कॉलेज ऑफ कॉमर्स से.17 यांचेही 150 हून अधिक एनएसएस विद्यार्थी तसेच यशवंतराव कॉलेजचे 100 हून अधिक विद्यार्थी हे 100 हून अधिक स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक व नमुंमपा अधिकारी - कर्मचारी आणि महानगरपालिका व सिडकोचे स्वच्छताकर्मी यांच्यासह सक्रीय सहभागी झालेले होते. या मोहीमेत 2 हजार किलोहून अधिक कचरा संकलित करण्यात आला.
घणसोली विभागातील घणसोली व रबाळे या दोन्ही रेल्वे स्टेशनवर सहा.आयुक्त संजय तायडे आणि स्वच्छता अधिकारी विजय पडघन यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहीमांमध्ये इंदिरा गांधी कॉलेज व टिळक कॉलेज यांच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी तसेच स्थानिक सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी नमुंमपा अधिकारी कर्मचारी तसेच सिडको व महानगरपालिकेचे स्वच्छताकर्मी यांच्यासह सहभागी होत रेल्वे स्टेशन पॅसेज व परिसर स्वच्छ केला. ऐरोली सेक्टर 3 येथील रेल्वे स्टेशन परिसरात सुशिलादेवी देशमुख विद्यालय सेक्टर 4 येथील एनएसएसचे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक व सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी स्वच्छता मोहीमेत सहभागी होत ऐरोली विभागाचे सहा.आयुक्त शंकर खाडे व उपमुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली 120 गोणी कचरा संकलीत केला. दिघा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता अधिकारी प्रविण थोरात व नमुंमपा अधिकारी कर्मचारी यांनी पालिकेच्या व सिडकोच्या रेल्वे स्वच्छताकर्मीसह सखोल स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये परिसरातील नागरिक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोहीमेत 250 किलो प्लास्टिक, कागद, कापड असा कचरा संकलित करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai