Breaking News
4 हजारहून अधिक जणांचा सहभाग
नवी मुंबई ः आशियातील सर्वात मोठया एपीएमसी मार्केटमध्ये लोकसहभागातून नवी मुंबई महापालिका आणि मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये नमुंमपा व एपीएमसी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वच्छताकर्मी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, युवक, विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिक यांनी 4 हजारहून अधिक मोठया संख्येने सहभागी होत हे भव्यतम अभियान यशस्वी केले.
यामध्ये विशेषत्वाने विविध महाविद्यालयांचे एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याप्रमाणे एपीएमसी मार्केटमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांनी ते ज्या मार्केटमध्ये काम करतात तेथील स्वच्छता मोहीमेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छतामित्र तसेच एपीएमससी मार्केट्सचे स्वच्छताकर्मी यांनीही अभियान यशस्वी करण्यात योगदान दिले. विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहीमेत सक्रिय सहभागी झाले. एपीएमसी मार्केट मधील कांदा बटाटा मार्केट येथे अभियानाचा शुभारंभ करताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीची सामुहिक शपथ ग्रहण करीत स्वच्छतेस प्रारंभ केला. भाजीपाला मार्केट, फळ बाजार, मसाला मार्केट, दाणा बाजार अशा पाचही मार्केटमध्ये सखोल स्वच्छता मोहीम व्यापक जनसहभागातून राबविण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छताकर्मींप्रमाणेच एपीएमसी मार्केटमधील स्वच्छताकर्मींच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी शिबिराचे तसेच तंबाखूमुक्ती जनजागृती शिबिराचे आयोजन महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले. या पाच मार्केटमध्ये नेहमीच व्यापारी, पुरवठादार व ग्राहक यांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. दररोज 40 हजारापर्यंत नागरिक 5 मार्केट्सना भेटी देतात, अशा सदोदीत गर्दीच्या ठिकाणी साफसफाई करणे हे एकप्रकारे आव्हानच आहे. यादृष्टीने पाचही मार्केट्समध्ये लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या महास्वच्छता अभियानामध्ये महानगरपालिकेच्या वतीने मॅकेनिकल स्विपींग मशीन, जेटींग मशीन, डस्ट सप्रेशन व्हेईकल, सक्शन युनीट, जेसीबी, डम्पर, कचरा संकलनाच्या घंटागाड्या आदी वाहनांचाही वापर करण्यात आला. जेटींग मशीनव्दारे एपीएमसी मार्केट परिसर स्वच्छ करण्यात आला. विशेषत्वाने भाजीपाला मार्केटमधील प्लॅटफॉर्मची सफाई करण्यात आली. त्यासाठी प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे निर्जंतुकीकरणही करण्यात आले. अडगळीच्या जागांचीही सफाई करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एपीएमसीचे सचिव डॉ.पी.एल. खंडागळे यांच्यासह भाजीपाला मार्केटची अंतर्गत व परिसर पाहणी करुन त्याठिकाणी नियमित स्वच्छता राहील अशाप्रकारे सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai