Breaking News
मानवी साखळी आंदोलनाद्वारे सिडकोचा तीव्र विरोध
नवी मुंबई : खारघर ते नेरूळ हा सागरी किनारा रस्ता तयार करण्याचे नियोजन सिडकोने केले आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सिडकोने बेलापूर सेक्टर-15 तसेच 11 परिसरातील नागरिकांनी लावलेल्या जवळजवळ 30 हजार झाडांवर कुऱ्हाड कोसळणार असल्याची शक्यता असल्याने परिसरातील नागरिकांनी मानवी साखळी करत सिडकोचा तीव्र निषेध केला. नियोजित खारघर ते नेरुळ सागरी किनारा मार्गाच्या विरोधात मुख्यमंत्री, सिडको अधिकारी यांची भेट घेणार असून वेळ पडल्यास न्यायालयाचाही दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
सिडकोने खारघर सेक्टर 16 जलमार्ग ते खारघर रेल्वेस्थानक येथून किल्ला गावठाण ते नेरुळ जेट्टीमार्गे निवासी भागापर्यंतचा रस्ता प्रस्तावित केला आहे. सिडकोने याबाबत नोटीस प्रसिद्ध केली असून त्यासाठी निविदा मागवल्या आहेत. या सागरी किनारा मार्गाच्या निर्मितीमुळे 2013 पासून बेलापूर सेक्टर 11, परिसरात 12 वर्ष लावलेल्या झाडांच्या मुळावर या कोस्टल रोडचे संकट ओढवले आहे. बेलापूर सेक्टर 11 तसेच 15 परिसरात हजारो झाडे नागरिकांनी लावली,जोपासली आहेत. त्यामुळे या 30 हजार झाडांची निसर्ग संपदा व या विभागाचे सौंदर्य जपण्यासाठी रविवारी या विभागातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन या सागरी किनारा मार्गाला विरोध केला आहे. सेक्टर 15 वॉकर्स फाऊंडेशनच्या माध्यामातून मानवी साखळी करत सिडकोच्या व शासनाचा भूमिकेचा निषेध केला. यावेळी निषेधार्थ माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, रामचंद्र दळवी, डॉ.जयाजी नाथ यांनी आंदोलनात सहभाग घेत सिडकोच्या नियोजनाचा निषेध केला. दुसरीकडे नागरिकांनी नवी मुंबई महापालिकेला अंधारात ठेवून सिडको या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकल्पामुळे सीबीडी सेक्टर 15 परिसराचे सौंदर्य आणि शांतता नष्ट होण्याची भिती आहे. या परिसरातील 30 हजार झाडे मारली जाणार आहेत. त्यामुळे सिडकोच्या या कोस्टल रोडला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai