Breaking News
सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केली प्रकल्प स्थळाची पाहणी
नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन नवनिर्वाचित सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी 24 सप्टेंबर 2024 रोजी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणी नियोजित वेळेत पूर्ण व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
सिडकोतर्फे 1160 हेक्टर क्षेत्रावर, दोन टप्प्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वांत मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ साकारण्यात येत आहे. सदर विमानतळ हे प्रती वर्ष 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.5 टन मालवाहतुकीकरिता नियोजित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानांच्या स्वतंत्र प्रवर्तानाकरिता दोन समांतर धावपट्ट्या आणि पूर्ण लांबीचे दोन समांतर टॅक्सी वे असणार आहेत. सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येत असलेल्या विमानतळाच्या विकासाची जबाबदारी सवलतधारक कंपनी एनएमआयएएल यांच्यावर आहे. विकासपूर्व कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नुकतीच विमानतळ प्रकल्प स्थळी भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेली सिग्नल चाचणी व इन्स्ट्रूमेंट लँडिंग सिस्टीम चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.
या भेटीदरम्यान अध्यक्ष यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत सिडकोचे अधिकारी व सवलतधारक एनएमआयएएलच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी नियोजित वेळेत पूर्ण व्हावी याकरिता संबंधितांना निर्देश दिले.
हा प्रकल्प राष्ट्रीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. नवी मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विकासाकरिता हा प्रकल्प योगदान देणार आहे. प्रकल्पाच्या कामाची प्रगती समाधानाकारक आहे. प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणीकरिता कालमर्यादेमध्ये कामे पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे लवकरच येथून विमानाचे उड्डाण होणार आहे.- संजय शिरसाट, अध्यक्ष, सिडको
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai