Breaking News
नवी मुंबई ः केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून नवी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा स्काडा प्रकल्प राबवण्यासाठी निविदा मागवली आहे. त्यासाठी 112 कोटी रुपये महापालिका खर्च करणार असून यातील निम्मा खर्च केंद्र व राज्य सरकार उचलणार आहे. यापुर्वी पालिकेने केंद्र सरकारच्या जेएनएनआरयुएम अंतर्गत ही योजना शहरात राबविली होती त्यासाठी 42 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. हा प्रकल्प आता जुना झाल्याने नवीन तंत्रज्ञानाने स्काडा योजना राबवण्याचे पालिकेने ठरवले आहे.
नवी मुंबई महापालिकेने 8 विभागांमध्ये स्काडा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी 112 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. या योजने अंतर्गत पाण्याची गळती थांबवणे, प्रत्येक नोड आणि सेक्टर निहाय लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी वाटप करण्याचे धोरण राबवणे, एकच दाबाने पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणे यासारखी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. पाणीगळती शोधणारे स्वतंत्र तंत्रज्ञान यात अंतर्भुत केले आहे. यामध्ये नवी मुंबईतील 8 प्रभागात 273 डिस्ट्रीक मीटर एरिया तयार केले आहेत. डिस्ट्रीक मीटर एरिया हा लोकसंख्या गृहित धरुन करण्यात आला असून लोकसंख्येच्या व शासनाच्या मानकानुसार प्रतिमाणसी पाणी पुरवले जाणार आहे. त्यामध्ये बेलापुर, वाशी, नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा येथे प्रत्येक डीएमएमध्ये फ्लो मिटर्स, प्रेशर ट्रान्स मिटर्स, ॲक्चुएटर वॉल बसवण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुर्णतः ॲटोमेशनवर राहणार असून त्याची कार्यप्रणाली प्रत्येक विभाग कार्यालयात बसवण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणावरुन प्रत्येक प्रभागात पाणी पुरवठ्यावर नजर ठेवणे शक्य होणार आहे.
महापालिकेने यापुर्वी ही निविदा मागवली होती. त्यावेळी 28 निविदाधारकांनी यामध्ये भाग घेतला होता. त्यावेळी निविदापुर्व मीटींगमध्ये अनेक सूचना निविदाधारकांनी केल्यानंतर सदर निविदेच्या तांत्रिक तपशीलात अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा सुधारित तांत्रिक बदलास तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया राबवली आहे. ही निविदा 23 सप्टेबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत खुली असून 15 ऑक्टोबरला निविदा उघडण्याचे निश्चित करण्यात आले. या निविदेला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai