Breaking News
नवी मुंबई ः अन्वय व्यसनमुक्ती केंद्रातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरमहाविद्यालयीन व्यसनविरोधी पथनाट्य स्पर्धा वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात पार पडली. या स्पर्धेत 13 महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
अन्वय प्रतिष्ठान, मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ , नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतर महाविद्यालयीन व्यसनमुक्ती पथनाटय स्पर्धा बुधवार, 25 सप्टेंबर रोजी वाशीतील साहित्य मंदिर येथे संपन्न झाली. यामध्ये मुंबई नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील 13 महाविद्यालयांनी भाग घेतला. अभिनेते अशोक पालवे आणि नाट्य दिग्दर्शक वासंती भगत यांनी परीक्षक म्हणून स्पर्धेचा निकाल दिला. यामध्ये एस आय इ एस (नेरूळ )कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स यांना प्रथम क्रमांक, सेंट जोसेफ कॉलेज, विरार यांना द्वितीय पारितोषिक तर रा फ नाईक स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, कोपरखैरणे हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. अंजुमन इस्लामस् काळसेकर टेक्निकल कॅम्पस, पनवेल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. स्पर्धा संपल्यावर नवी मुंबई नार्कोटिक सेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. त्यांनी ड्रगच्या संदर्भात कायदे किती कडक आहेत हे सांगून विद्यार्थ्यांनी यासंदर्भातली कोणतीही माहिती लपवून ठेवता मला या नंबरवर पण सरळ फोन करून सांगू शकता असा विश्वास दिला. त्यामुळे विद्यार्थी भारावून गेले. याप्रसंगी अन्वयचे डॉ अजित मगदूम यांनी मुलांनी सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करावं आणि आत्मविश्वासानं आपलं करियर घडवावं. भारत आणि जगातले इतर देश आपली वाट पाहत आहेत असा मोलाचा सल्ला दिला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai