Breaking News
नवी मुंबई : वन विभाग अंतर्गत कांदळवन विभागाच्या वतीने वाशीगांव खाडीकिनाऱ्यालगत पुन्हा एकदा पोलीस संरक्षणात संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु आहे. या संरक्षक भिंतीला वाशीगांव ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच वाशी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने वाशीगांव ग्रामस्थांनी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या नेतृत्वात आमदार गणेश नाईक यांची भेट घेऊन संरक्षक भिंतीचे काम थांबविण्याची त्यांना विनंती केली.
वन खात्याच्या कांदळवन विभागान यापूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये वाशीगांवच्या मागील बाजुस नाखवा सिताराम भगत सी-बीच रस्त्यालगत खाडीकिनाऱ्यावर संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु केले होते. त्यावेळी वाशी ग्रामस्थांनी या भिंतीच्या कामास प्रखर विरोध केल्याने सदरचे काम अर्धवट सोडण्यात आले होते. पण, आता 23 सप्टेंबर रोजी पुन्हा कांदळवन विभागाने पोलीस बंदोबस्तात संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात केल्याने वाशी ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला. त्यामुळे वाशी ग्रामस्थांनी दशरथ भगत यांच्या नेतृत्वात तात्काळ आ. गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडून भिंतीचे काम थांबविण्यासठी निवेदन दिले. आमदार नाईक यांनी तातडीने ठाणे जिल्हा कांदळवन विभाग, महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधून समन्वयक बैठक घेतली. वाशीगांव ग्रामस्थ समुद्र-सामुद्रिक नैसर्गिक संपत्ती यांचे पारंपारिक नाते असून त्यावर गदा आणू नका. त्याठिकाणी ग्रामस्थ कोणतेही रहिवासीय अतिक्रमण करीत नसल्याने अनावश्यक संरक्षक भिंत उभारु नका, असे आ. गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai