Breaking News
नवी मुंबई : स्वच्छता ही सेवा मोहीमेत थ्री आर संकल्पनेनुसार उपक्रम राबविण्याकडेही विशेष लक्ष देत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता अभियान अंतर्गत नमुंमपा क्षेत्रातील 92 थ्री आर सेंटर या ठिकाणी जुने कपडे संकलन मोहीम तसेच ई वेस्ट संकलन मोहीम महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया प्रमाणात राबविण्यात आली. यामध्ये ठिकठिकाणी नागरिकांनी उत्साही सहभाग घेत आपल्याकडील वापरात नसलेले वापरण्यायोग्य कपडे नजिकच्या थ्री आर सेंटरमध्ये आणून दिले. त्याठिकाणी उपस्थित गरजू नागरिकांनी त्यांना हवे असलेले त्यातील कपडे वापरासाठी घेतले तसेच उर्वरित कपडे महानगरपालिकेमार्फत संकलीत करण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षणातील महत्वाचा भाग असलेल्या थ्री आर संकल्पनेंतर्गत कचरा कमी करणे, कच-याचा पुनर्वापर करणे आणि कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत शहरात 92 मोक्याच्या ठिकाणी माणुसकीचे देणे घेणे शिर्षकाची थ्री आर सेंटर्स उभारण्यात आलेली आहेत.
या सेंटरमध्ये नागरिक त्यांच्या वापरात नको असलेल्या पण इतरांना वापरता येतील अशा कपडे, खेळणी, पुस्तके, भांडी अशा वस्तू आणून ठेवत असून त्या वस्तूंची ज्यांना गरज आहे अशा व्यक्ती तिथून घेऊन जात असतात. नको असेल ते द्या आणि हवे असेल ते घ्या या संकल्पनेवर आधारित थ्री आर सेंटर्समुळे कच-यात टाकून दिल्या जाणा-या वस्तू गरजूंच्या वापरात आल्याने कच-याच्या प्रमाणात घट झालेली आहे. 92 थ्री आर सेंटर्सपैकी बेलापूर विभागात 13, नेरुळ विभागात 12, वाशी विभागात 7, तुर्भे विभागात 16, कोपरखैरणे विभागात 16, घणसोली विभागात 11, ऐरोली विभागात 11 व दिघा विभागात 4 थ्री आर सेंटर्स आहेत. स्वच्छता ही सेवा उपक्रम अंतर्गत थ्री आर सेंटर्समध्ये आज 11 वाजल्यापासून नागरिकांनी आपले जुने वापरण्यायोग्य कपडे आणून द्यावेत असे महानगरपालिकेमार्फत विविध माध्यमांतून आवाहन करण्यात आले होते. त्याला सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद लाभला.
त्याचप्रमाणे ई वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचा कचराही आज संकलित करण्यात आला. यामध्ये रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई या संस्थेचे सहकार्य महानगरपालिकेस लाभले. या मोहीमेत संगणकाचे सीपीयू, मॉनिटर, किबोर्ड, माऊस तसेच मोबाईल, हेडफोन, पोर्टेबल बॅटरी, स्विचेस अशा विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचा इ कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये मोराज सोसायटी सानपाडा, वाशीतील वाणिज्य संकुले, से. 6 नेरुळ येथील जय बालाजी सोसायटी, सीवूड इस्टेट फेज वन अशा सोसायट्यांमधील नागरिकांनी मोठया प्रमाणावर ई वेस्ट दिले. या मोहीमेंतर्गत एकूण 71 किलो ई वेस्ट जमा झाले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व संतोष वारुळे, परिमंडळ उपआयुक्त सोमनाथ पोटरे व डॉ. कैलास गायकवाड यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या ‘थ्री आर' सेंटर्सवरील कपडे संकलन मोहीमेस व ई वेस्ट संकलन मोहीमेस नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai