Breaking News
नवीन पनवेल : खारघरमधील आरटीआय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व त्यांच्या सहकार्यांनी कोट्यावधी रुपयांचे अनुदान देण्याचे अमिष दाखवून 15 जणांना 1 कोटी 98 लाख रूपयांना फसविल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी खारघर पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
औरंगाबाद मधील श्री शंकर स्वामी बहुउद्देशीय विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष व श्री साई सामाजिक विकास संस्थेचे उपाध्यक्ष जगन्नाथ खंडेराव जाधव यांनी याविषयी तक्रार केली आहे. जाधव हे पदाधिकारी असलेल्या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यांच्या शाळेतील एका शिक्षकाने खारघरमधील आरटीआय पब्लिक चॅरीटेबल ट्रस्टकडे हजारो कोटी रूपये आहेत. ते सामाजिक उपक्रमासाठी संस्थेला पाच कोटीपर्यंत मदत उपलब्ध करून देतील असे सांगितले. जाधव यांनी मे 2019 मध्ये खारघरमधील आरटीआय ट्रस्टच्या कार्यालयात येऊन माहिती घेतली. ट्रस्टचे आयसीआयसीआय बँकेत 7889 कोटी रूपये शिल्लक असून ज्या संस्थांना मदत हवी आहे त्यांनी 5 लाख रूपये भरून ट्रस्टचे सदस्य व्हावे असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून जाधव यांनी त्यांच्या दोन्ही संस्थांच्या नावाने एकूण 10 लाख रुपये दिले. आरटीआय ट्रस्टने त्यांच्या दोन्ही संस्थांसाठी 5 कोटी रूपयांचा चेक दिला. परंतु चेक बँकेत जमा करू नका असे सांगितले. चेकवरील तारखेची मुदत संपल्यानंतर पुन्हा ट्रस्टशी संपर्क साधला असता ट्रस्टचे फिनो बँकेशी टायप झाले असून तेथे 400 कोटी रूपयांची एफडी करत आहोत. त्यानंतर पैसे देतो असे सांगितले. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे मिळाले नसल्यामुळे जाधव यांनी खारघर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरटीआय चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी मिळून 4 जणांविरोधात 4 जूनला गुन्हा दाखल केला आहे. आरटीआय ट्रस्टने जाधव यांच्याप्रमाणे जवळपास 15 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या सर्वांची एकूण 1 कोटी 98 लाख रूपयांची फसवणूक झाली असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. हे प्रकरण तपासासाठी नवी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai