Breaking News
पनवेल : गुन्हेगारीचा नवा प्रकार आता सुरू झाला आहे. फोन करून पोलिसांच्या नावाने धमकावण्याचे प्रकार सुरू असतानाच आता ईडीच्या नावाने धमकावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. म्हणूनच तुमच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा कुणी फोन केल्यास सावध राहा. कारण अशाच एका फोन कॉलमुळे पनवेलमधील महिलेची तब्बल 1 कोटी 31 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी फिर्यादीने सोमवारी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर अर्जाची पडताळणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पनवेलमधील एका महिलेला 8 नोव्हेंबर रोजी मोबाईलवर एक कॉल आला. संबंधित व्यक्तीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअरमधून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर ‘तुमच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या मालमत्तेची पडताळणी करणे आवश्यक आहे.
यासाठी तुमच्या कडील सर्व रक्कम आरबीआयच्या बँक खात्यात जमा करावी लागेल. त्याची पडताळणी होताच ही रक्कम परत तुमच्या खात्यात वर्ग केली जाईल’ असे सांगितले. एवढेच नाही तर त्या व्यक्तीने ईडीच्या नावाचे बनावट पत्रही फिर्यादीला पाठवून सर्व बँक खात्यांची माहिती देण्यास सांगितले.
या प्रकाराने संबंधित महिला घाबरून गेल्या. त्यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या तीन बँक खात्यांत स्वत:कडील सर्व रक्कम वळती केली. ही सर्व फसवणूक 8 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आली. काही दिवसांनी फिर्यादीने चौकशी झाली असेल तर रक्कम परत करा म्हणून फोन करून विचारणा केली. त्यावर त्या व्यक्तीने टाळाटाळ केली. त्यानंतर संपर्क बंद केला. त्यानंतर फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला असून तांत्रिक डिटेल्स घेण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच हा गुन्ह्याला शोध लागेल, अशी अपेक्षा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai