Breaking News
व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याचा शोध सुरू
नवी मुंबई : इराण देशातून स्वस्तात सफरचंद आणि किवी फळ आयात करुन देण्याच्या बहाण्याने एका दाम्पत्याने एपीएमसी मार्केट मधील एका फळ व्यापाऱ्याला तब्बल 82 लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. आबिद रजा व फारवा रजा असे या दाम्पत्याचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी या दाम्पत्याविरोधात फसवणुकीसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दोघांचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार रमाकांत तिवारी हे वाशीतील मे.वासमी फार्म फ्रेश प्रा.लि. या कंपनीचे प्रतिनीधी असून ऑगस्ट 2023 मध्ये या प्रकरणातील आरोपी दाम्पत्य आबिद रजा व त्याची पत्नी फारवा रजा या दोघांची ओळख झाली होती. आबिद रजा याने त्याचा भाऊ कबीर रजा हा इराण देशात राहत असल्याचे व तो त्याच्या कंपनीमार्फत सफरचंद आणि किवीचा एक्स्पोर्ट चा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. तसेच त्याचा भारतातील व्यवसाय तो व त्याची पत्नी बघत असल्याचे सांगून त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास सांगितले होते.
तिवारी यांचा विश्वास बसावा यासाठी अबिद रजा याने गुप्ता यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला इराण येथे घेऊन जाऊन त्याला कबीर रजा याच्या कंपनीतील कोल्ड स्टोरेज दाखवून आणले होते. त्यामुळे तिवारी यांनी त्यावेळी 2 कंटेनर किवी व 4 कंटेनर सफरचंद आयत करण्यासाठी आबिद रजा याच्या खात्यावर एकुण 82 लाख 82 हजार रुपये पाठवले. मात्र त्यानंतर देखील अबिद रजा याने एकही कंटेनर माल आयात केला नाही. उलट अबिद रजा याने तिवारी यांच्याकडे आणखी 50 लाख रुपयांची मागणी करुन आणखी मालाची बुकींग करण्यास सांगितले. मात्र तिवारी यांनी पहिल्या बुकींगचे कंटेनर मागवून घेण्यास सांगितले असता आबिद रजा याने इराण देशातुन भारतामध्ये येणाऱ्याा कंटेनरबाबतचे बनावट सर्टीफिकेट तिवारी यांना व्हॉट्सऍपवर पाठवून दिले.
तिवारी यांनी त्यावरील माहितीवरुन इराण येथुन निघणाऱ्या कंटेनरबाबत खात्री केली असता, अबिद रजा याने पाठवलेली कॉपी बनावट असल्याचे आढळुन आले. त्यामुळे तिवारी यांनी अबिद रजा याच्याकडे आपल्या पैशांची मागणी केली असता, त्याने 23 लाख रुपये तिवारी यांना दिले. तसेच उर्वरीत 59 लाख 82 हजाराच्या रक्कमेचे 3 चेक तिवारी यांना दिले. मात्र सदरचे चेक वटले नाहीत. त्यानंतर फसवणुक झालेल्या रमाकांत तिवारी यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai