Breaking News
सिडकोच्या घरांच्या किमंतीत 4 लाखापर्यंत वाढ
नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईत 14,900 घरांचा महागृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहे. कोव्हिड काळातील बंदमुळे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने लाभार्थ्यांकडून वेळेवर कागदपत्रांची पुर्तता होऊनही सिडकोने त्यांना वेळेत वाटपपत्रे दिली नाहीत. आता या दिरंगाईचे खापर लाभार्थ्यांवर फोडून दोन ते चार लाख रुपयांनी घरांच्या किमंती वाढवून त्यांना नव्याने वाटपपत्र देण्यात आली आहेत. त्यामुळे सिडकोच्या या वसूलीस सरकारचा आशिर्वाद आहे का? असा सवाल विचारला जात आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने 2018 साली 14 हजार घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यामध्ये सिडकोने सूमारे 9 हजार नागरिकांना इरादा पत्र देवून सोबत प्रतिक्षा यादीही जाहीर केली होती. ही घरे आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी राखीव असून त्यांना अनुक्रमे 25 चौ.मी. व 31 चौ. मी क्षेत्रफळाची घरे अनुक्रमे 18 लाख व 25 लाखांना वाटप करण्यात येणार होती. 2019 मध्ये काढलेल्या वाटपपत्राद्वारे सिडकोने घरांची किंमत ठरवून त्यानूसार लोकांना पत्रं पाठवली होती. गेली दोन वर्ष कोव्हिडमुळे बांधकाम तसेच कार्यालयीन कामकाज बंद असल्याने याबाबत आवश्यक ती प्रक्रिया राबविण्यास सिडको अपयशी ठरली. सिडकोच्या पणन विभागाने प्रतिक्षा यादीवरील लाभार्थ्यांना वाटपपत्र देताना 18 लाखांच्या घराची किंमत दीड-दोन लाखांनी तर 25 लाखांच्या घराची किंमत 3 ते 4 लाखांनी वाढवून संबंधितांना 30 ऑक्टोबरपर्यंंत पैसे भरण्याची मुदत दिली आहे.
2019 मध्ये ज्या लाभार्थ्यांना वाटपपत्र देण्यात आले त्यांनी लगेचच पैसे भरण्याची तयारी दर्शवूनही सिडकोच्या निवारा केंद्रातील ढिसाळ कारभारामुळे संबंधितांना पैसे भरता आले नाहीत. एवढेच नाहीतर ज्या लाभार्थ्यांनी बँकेचे कर्ज मंजूर करुन घेतले होेते त्यांचीही मुदत संपल्याने त्यांना सदर लोन पुन्हा मंजुर करुन घेण्यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागत आहे. आता जाग आलेल्या सिडकोच्या पणन विभागाने नव्याने वाढीव किमतीचे वाटपपत्र दिल्याने संबंधित लाभार्थ्यांच्या पायाखालची वाळुच सरकली आहे. सिडकोच्या या वसूलीमुळे लोकांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे संबंधित सिडकोच्या वसूलीने ग्रस्त झालेल्या लाभार्थ्यांनी ‘आजची नवी मुंबई’ला सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे