Breaking News
दिलेल्या रक्कमेच्या प्रमाणात दलालाकडून काम करुन घेण्याचे निर्देश
नवी मुंबई ः पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 700 कोटी रुपये किमंतीच्या नेमलेल्या दलालास सिडकोने आतापर्यंत 107 कोटी रुपये अदा केले होते. दलालाच्या नेमणुकीवर लोकप्रतिनिधींनी प्रश्नचिन्ह उभे केल्यावर संबंधित दलालाचे काम सिडकोने थांबवले होते. परंतु, दिलेली रक्कम कशी वसूल करावी या चिंतेत असलेल्या सिडकोला दिलेल्या रक्कमेएवढे काम करुन घेण्याचे निर्देश सप्टेंबर 2024 ला सरकारने दिले आहेत. अखेर सरकारनेच अभय दिल्याने सिडको अधिकारी व दलालाने सुटकेचा श्वास सोडला आहे.
सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या 67 हजार घरांच्या विक्रिसाठी दलाल नेमला होता. सदर दलालाच्या पात्रतेबाबत आजची नवी मुंबईने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत तत्कालीन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अजित पवार तसेच आमदार जयंत पाटील यांनी लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्याने सिडकोने हे काम स्थगित केले होते. याबाबत शासनाने अहवाल मागवला असता तो सिडकोने सादर केला व याबाबत निर्देश देण्याची अनेक स्मरणपत्रे सिडकोला लिहीली. परंतु, शासनाने याबाबत कोणतेही निर्देश न दिल्याने 22 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवण्यात आले. यामध्ये सिडकोची 37 हजार घरे बांधून तयार असून त्यात सिडकोचे शेकडो कोटी रुपये अडकून पडले आहेत. शासनाने याबाबत निर्णय न घेतल्याने सदर विक्रिची लॉटरी काढता येत नसल्याचे सिडकोने शासनाला कळवले. शासनाने अखेर 27 सप्टेंबर 2024 रोजी जेवढे पैसे दलालाला आतापर्यंत दिले आहेत तेवढेच रक्कमेचे काम कराराप्रमाणे करण्याची कारवाई करावी असे निर्देश दिल्याने सिडको संचालक मंडळाने ऑक्टोबर 2024 च्या बैठकीत सदर दलालाकडून 26,675 घरे विक्रिचे काम करुन घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सिडकोच्या 700 कोटींचा दलाल नेमण्याच्या निर्णयाला शासनानेच अभय दिल्याने सिडको अधिकारी व दलालाने सुटकेचा श्वास सोडला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे