नवी मुंबई ः महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागात काम करणार्या कर्मचार्याने आयुक्तांकडे विभागात कर परताव्यामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा घोटाळा अधिकार्यांनी केल्याची तक्रार आयुक्त बांगर यांच्याकडे केली आहे. या तक्रारीची दखल पालिका आयुक्तांनी घेतली असून उपायुक्त दर्जाच्या अधिकार्याकडून याबाबत प्राथमिक चौकशी अहवाल मागविण्यात येणार आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यास संपुर्ण कर परताव्याचे विशेष लेखापरिक्षण करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे बांगर यांनी ‘आजची नवी मुंबई’शी बोलताना सांगितले. राज्यात जकातीला पर्याय म्हणून उपकर/स्थानिक संस्था कर आकारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. राज्यात स्थानिक संस्था कर लागू करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका ठरली होती. महापालिका क्षेत्रात 37512 व्यापारी स्थानिक संस्था कर विभागात नोंदणीकृत असून त्यांच्याकडून पालिका 1996 पासून 2017 सालापर्यंत म्हणजेच वस्तू व सेवा कर लागू होईपर्यंत नियमित स्थानिक संस्था कर वसूल करत असे. लेखापरिक्षण विभागात लाखो कर परताव्याची प्रकरणे प्रलंबित असून पालिकेच्या अधिकार्यांमार्फत त्याचे करनिर्धारण करण्यात येत असून संबंधित व्यापार्यांना कर परतावा दिला जात आहे. यापुर्वी 2010 मध्ये तत्कालीन आयुक्तांनी उपायुक्त संतोष सिंग परदेशी यांनी केलेल्या कर परताव्यातील प्रकरणांच्या चौकशीचे आदेश दिल्यावर तत्कालीन उपायुक्त पेंढारी यांनी आठ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अहवाल आयुक्तांना सादर केला होता. याबाबत संबंधित अधिकार्याची विभागीय चौकशी करण्यासाठी पालिकेने शासनाकडे शिफारस करुनही संबंधित प्रकरण अद्यापही प्रलंबित आहे. दहा वर्ष परदेशी यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे ओएसडी म्हणून काम पाहिले तर आता परदेशी यांचे मोठे बंधु प्रविण परदेशी राज्य सरकारकडे मोठ्या पदावर काम करत असल्याने या प्रकरणाला अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही. पालिकेच्या कर्मचार्यानेच पुन्हा स्थानिक संस्था कर विभागात दहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार आयुक्तांना करुन संबंधित विभागातील व्यवहाराची चौकशी निवृत्त न्यायधीशांमार्फत करण्याची मागणी करुन पालिकेत खळबळ उडवून दिली आहे. संबंधित कर्मचार्याने आपण या भ्रष्टाचारात साक्षीदार म्हणून साक्ष देण्यास तयार असल्याचे सांगितल्याने संबंधित अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत. या तक्रारीत पालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच अतिरिक्त आयुक्त यांच्याबाबत गंभीर तक्रार करण्यात आली असून ते ‘कोळी’ जसा जाळं विणून भक्ष्याला लक्ष्य करतो तशाच प्रकारे व्यापार्यांवर अनावश्यक ‘दया’ दाखवून लाखोंची वसूली करत असल्याने संबंधित तक्रार अँटी करप्शन विभागाकडे वर्ग करावी अशी विनंती आयुक्तांना करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून याबाबत चौकशीसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकार्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित अहवालात तथ्य आढळल्यास याबाबत विशेष लेखा परिक्षण करण्याचा निर्णय घेण्याचा मनोदय आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला आहे. ‘आजची नवी मुंबई’ने सदर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेच्या अधिकार्यांमध्ये कमालीची घबराहट पसरली असून संबंधित तक्रारदाराला तक्रार मागे घेण्यासाठी आपल्या राजकीय गॉड फादर कडून दबाव आणत असल्याची चर्चा आहे.
स्थानिक संस्थाकर विभागाची सफाई 1. आयुक्त अभिजीत बांगर यांनी भ्रष्टाचाराची तक्रार प्राप्त झाल्यावर पालिका प्रशासनाकडून या विभागात चार वर्षाहून अधिक कार्यरत असणार्या अधिकार्यांची मागविली यादी 2. दिवाळीनंतर संबंधित विभागाची साफसफाई करण्याचा आदेश आयुक्तांनी उपायुक्त प्रशासनाला दिला आहे. त्याचबरोबर शासनाच्या आदेशानुसार संशयीत भ्रष्ट अधिकार्यांची यादीही बनविण्याचे प्रशासन विभागाला आदेश 3. उपायुक्त दर्जाच्या अधिकार्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर मागवला चौकशी अहवाल. त्यात तथ्य आढळल्यास आयुक्त देणार विशेष लेखा परिक्षणाचे आदेश
रिपोर्टर
संजयकुमार सुर्वे
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे