Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका निवडणुका फेब्रुवारीमध्ये लागण्याचे संकेत मिळत असून त्यादृष्टीने मतदारयाद्या आणि वाढीव नगरसेवकांच्या संख्येनुसार नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला दिले आहेत. महाविकास आघाडीने हि निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने अजितदादांच्या फेर्याही नवी मुंबईत वाढल्या असल्यातरी पालकमंत्र्यांना त्यांच्या दौर्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. महापालिका आयुक्त बांगर यांचा झुकाव या दौर्यात अजित पवारांच्या बाजूने दिसल्याने नाराज पालकमंत्र्यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना नवी मुंबईत आणण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे सूत्रांकडून कळत आहे.
नवी मुंबई महापालिकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोनीही पक्षात कुरघोडी सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात गणेश नाईकांनी नवी मुंबईतील अख्खी राष्ट्रवादी भाजपच्या दावणीला बांधल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादीचे म्हणावे तेवढे अस्तित्व जाणवत नाही. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत शिवसेनेचा जोर असल्याने राष्ट्रवादीला सेनेपुढे नमते घ्यावे लागत आहे. शिंदे यांच्या शिफारशींवर नियुक्ती करण्यात आलेल्या मिसाळ यांना कोरोना संक्रमण नवी मुंबईत वाढल्याचे कारण देत त्यांच्या जागी अभिजित बांगर यांची वर्णी लावण्यात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी उलाढाल करून एकदा मिसाळ यांच्या बदलीला मुख्यमंत्रांकडून स्थगिती मिळवल्याची चर्चा होती. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवल्याने उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे अजित पवार यांनी योग्य वेळ साधत बांगर यांच्या नवी मुंबई पालिकेतील नियुक्तीला ठाकरे यांच्याकडून हिरवा कंदील मिळवला. बांगर यांनीही कोरोना काळात चांगले काम केले असून पालिकेचे अनेक प्रकल्पही मार्गी लावले आहेत. परंतु महापालिका क्षेत्रात 154 कोटींच्या सीसीटीव्ही लावण्याच्या निविदा प्रक्रियेवरून बांगर आणि पालकमंत्री हे आमने सामने आल्याची चर्चा आहे. बांगर यांनी कोणताही राजकीय दबाव न स्वीकारता 271 कोटींची निविदा रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविल्याने पालकमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे.
कोरोना संक्रमण आटोक्यात आल्याने नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही लागण्याची चर्चा सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसह मतदार याद्या नोव्हेंबर अखेरपर्यंत तयार करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिनाभरात नवी मुंबईत दोनदा भेट दिली असून पहिल्यांदा त्यांनी सिडको तर दुसर्यांदा महापालिकेत जनता दरबार घेतला. या दोनही दौर्यांपासून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दूर ठेवण्यात आल्याने ते काहीसे नाराज असल्याचे बोलले जाते. या दोन्ही भेटीच्या वेळी अजित दादांबरोबर बांगर यांचे चांगले सूत जुळल्याचे पाहायला मिळाले आहे. नवी मुंबई महापालिकेवर यावेळी भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेने केला असून त्यासाठी पालिका आयुक्तांचे सहकार्य असणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यापासून बांगर यांना पालिकेत दोन वर्ष पूर्ण झाल्याने त्यांची बदली होणार असल्याची चर्चा असून त्यांच्या जागी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. नार्वेकर हे खासदार संजय राऊत यांचे जवळचे नातेवाईक असल्याने आपल्या जवळचा आयुक्त पालिकेवर असणे शिवसेनेच्या दृष्टीने आवश्यक आहे. पालिका आयुक्त नेमणुकीवरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हा वाद रंगण्याची चिन्हे असून त्याचा परिणाम पालिका निवडणुकीतील युतीला बसण्याची दात शक्यता आहे. त्यामुळे पालिका निवडणूक बांगर यांच्या अधिपत्याखाली होते कि अन्य अधिकार्यांच्या अधिपत्याखाली होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai