Breaking News
नवी मुंबई पालिका की महाराष्ट्र महापालिका!
नवी मुंबई ः राज्य सरकारमधील महसुल विभागातील ‘थोरां’नी आणि नगरविकास विभागातील ‘नव’नाथांनी अनेक अधिकार्यांचा अर्थपुर्ण बोलीवर नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीचा रतीब लावला आहे. हा रतीब लावताना संबंधितांनी शासनाने बनवलेल्या प्रतिनियुक्तीच्या नियमांना तिलांजली देत ही नियुक्ती केल्याने नवी मुंबई महानगरपालिकेचे रुपांतर महाराष्ट्र महानगरपालिकेत झाल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रतिनियुक्तीवर अनेक महानगरपालिकांत सरकारी अधिकारी पाठवण्याचे पेव फुटले आहे. या नियुक्त्या करण्यापुर्वी संबंधित अधिकार्यांची पार्श्वभुमी आणि प्रतिनियुक्ती नियमावली शासनाने 2016 साली निर्धारित केली आहे. कोणत्याही अधिकार्याला दहा वर्षांपेक्षा जास्त काळ प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येणार नाही, तसेच सलग तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एकाच ठिकाणी नियुक्ती करता येणार नाही अशी तरतूद नियमावलीत आहे. सा.‘आजची नवी मुंबई’ने 2016 साली नवी मुंबई महापालिकेत घाऊक दराने प्रतिनियुक्ती केलेल्या अधिकार्यांच्या नेमणुकीबाबत आवाज उठवला होता. त्यानंतर शासनाने प्रतिनियुक्तीची नियमावली जाहीर केली. परंतु, नंतर अधिकार्यांच्या मागणीवरून कोणत्याही मंत्र्याकडे प्रतिनियुक्तीवर काम केलेला कालावधी वगळण्याची सुधारणा सदर नियमावलीत करण्यात आली.
राज्य शासनाच्या अनेक विभागात लाखो जागा रिक्त असताना सरकारी अधिकार्यांना प्रतिनियुक्तीवर जाण्याचा सोस कशासाठी? याबाबत सरकारने निश्चित धोरण ठरवण्याची मागणी होत आहे. काही अधिकारी सरकारमधील ‘थोरांचा’ आणि ‘नव’नाथांचा आशिर्वाद घेऊन वारंवार प्रतिनियुक्तीवर जात असल्याचे समोर आले आहे. या नियुक्त्यांसाठी ते कोणता प्रसाद संबंधितांना देतात याबाबत खुलासा होण्याची मागणीही उपेक्षित अधिकार्यांकडून होत आहे. नवी मुंबई महापालिकेत सध्या अनेक जागांवर शासनाने प्रतिनियुक्तीवर अनेक अधिकारी पाठवले आहेत. काही अधिकार्यांची महापालिकेत येण्याची चौथी खेप असल्याचे बोलले जात आहे. काही अधिकार्यांचा नियुक्तीचा कालावधी संपला असतानाही आयुक्तांकडून त्यांना वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने अधिकारी वर्गात प्रचंड असंतोष आहे. सध्या पालिकेत धनराज गरड, सुजाता ढोले, आबासाहेब राजळे, मनोजकुमार महाले, जयदिप पवार, श्रीराम पवार, संजय काकडे, ठाणेकर असे अनेक प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कार्यरत असून त्यांच्या नेमणुकीमुळे अनेक अधिकार्यांची पदोन्नती रखडल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका ही महाराष्ट्र महानगरपालिका आहे का? असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे