Breaking News
नवी मुंबईच्या जडणघडणीत तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात चार दशके केंद्रबिंदू असलेले व्यक्तिमत्व
प्रश्न 1) कोरोना काळ हा सर्वांसाठीच आव्हानात्मक होता. या काळात नागरिकांना अनेक मार्गाने मदतीचा हात देवू केलात. त्या काळाबद्दल आपण काय सांगाल?
उत्तर : कोरोना काळ हा सर्वांसाठीच आव्हानात्मक होताच. त्यावेळची परिस्थिती अतिशय बिकट होती. पैसे असूनही लोकांना जिवनावश्यक सुविधा मिळत नव्हत्या. सख्खे नातेवाईक एकमेकांना पारखे झाले होते. अशावेळी समाजाला धीर देणे गरजेचे होते. त्यामुळे माझ्यासह सर्वच पक्षातील लोकांनी जीव धोक्यात घालून समाजाला मदतीचा हात दिला. अनेक कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने नागरिकांची मदत केली. लोकांना मास्क, औषधं, सॅनेटायझर, जीवनावश्यक वस्तूंचे, अन्नधान्याचे वाटप केले. सर्वांच्याच प्रयत्नांमुळे अन्य शहरांच्या तुलनेत नवी मुंबई या संकटातून लवकर सावरु शकली. अनेकांनी या काळात आपले जवळचे गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सात्वना व्यक्त करतो आणि भविष्यात असेे दुःख कोणाच्याही वाटेला येऊ नये अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.
प्रश्न 2) अडीच वर्ष पालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने आपण जनतेच्या समस्यांसाठी आयुक्तांना भेटत आहात. याकामी प्रशासनाचे कितपत सहकार्य मिळत आहे?
उत्तर : गेल्या 25 वर्षात मी फक्त तीन वेळा पालिकेत गेलो आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने लोकांचे प्रश्न आयुक्तांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक आठवड्याला मी आयुक्तांची भेट घेत आहे. आयुक्त बांगर हे सकारात्मक असून त्यांच्या नजरेस आणून दिलेले जनतेचे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी संबंधित अधिकार्यांना आदेश देतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी नसतानाही नवी मुंबईकरांच्या समस्यांचे निराकरण होत आहे. शहरात अजून अनेक घटकांचे विषय प्रलंबित आहेत त्यामध्ये फेरिवाले, छोटे व्यावसायिक, तृतीयपंथी, वेठबिगारी तसेच रस्त्यावरील भिकारी यांचा समावेश आहे. या सर्व घटकांना न्याय मिळाला तरच नवी मुंबईचा सर्वांगिण विकास झाला असे मला वाटेल.
प्रश्न 3) अनेक प्रलंबित प्रकल्पांबाबत आपण विधानसभेत आवाज उठविला. त्याबद्दल काय सांगाल?
उत्तर : नवी मुंबईला सध्या वाहतुक कोंडी आणि कनेक्टिव्हीटीचा प्रश्न भेडसावत आहे. विमानतळ सुरु झाल्यानंतर या समस्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन त्याचा फटका या नियोजित शहरात राहणार्या लोकांना बसेल. त्यामुळे मागील दोन्ही विधानसभा अधिवेशनात मी ऐरोली ते कटई उन्नतमार्ग, तुर्भे-खारघर बोगदा हे विषय लावून धरले. आता सदर कामांची निविदा प्रक्रिया सुरु झाली असून त्याचा फायदा नागरिकांना होईल. शहरात फ्रि वे, उन्नत मार्ग बांधणे काळाची गरज असून त्यासाठी मी वाशी ते ठाणे सागरी किनारी मार्गासाठी आग्रही आहे. हा मार्ग एमएमआरडीएने करावा अशी मी सरकारकडे मागणी केली आहे.
प्रश्न 4) केंद्र सरकारच्या नवी मुंबईतील प्रस्तावित डाटा सेंटरविषयी काय सांगाल?
उत्तर : सध्याच्या घडीला आपल्या देशाची, बँकांची अनेक उद्योग समुहांची माहीती ही चीन, हाँगकाँग, सिगांपुर सारख्या देशात ठेवली जाते. त्यासाठी कोट्यावधी रुपये मोजावे लागतात शिवाय त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी येत्या पाच वर्षात 15 लाख कोटी खर्चुन तीन ठिकाणी डाटा सेंटर बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. हे डाटा सेंटर नवी मुंबईत आले तर हजारो रोजगाराच्या संधी नवी मुंबईत उपलब्ध होतील. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेलाही मिळणार्या उत्पन्नात भर पडेल. हा प्रकल्प नवी मुंबईत यावा म्हणून मी प्रयत्नशील आहे.
प्रश्न 5) एमआयडीसी भूखंड वाटप व सर्व्हिस रोडवरील बांधकामांबाबत आपण आवाज उठवत आहात. त्याबद्दल आपली भुमिका काय?
उत्तर : एमआयडीसीने त्यांच्या लेआऊटमध्ये वनीकरणासाठी सोडलेल्या मोकळ्या जागांवर भुखंड वाटप केले आहे. हे भुखंड वाटप अनेक दलालांच्या माध्यमातून होत असून नियोजित शहराची वाट लावण्याचे काम काही राजकर्त्यांच्या माध्यमातून अधिकारी करत आहेत. सर्व्हिस रोडलगत असलेल्या मोकळ्या जागांवर हे भुखंड वाटप होत असल्याने भविष्यात रस्तारुंदीकरणास अडथळा निर्माण होणार आहे. प्रमुख रस्ता एखाद्या कारणाने बंद झाला तर वाहतुकीची कोंडी सर्व्हिस रस्त्याचा वापर करुन सोडवता येऊ शकते. मी याबाबत आवाज उठविल्यानंतर एमआयडीसीने अनेकांचे भुखंड वाटप रद्द केले आहे. या भुमिकेतूनच मी हा विषय हाती घेतला असून तो पुर्णत्वास गेल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.
प्रश्न 6) गेली 25 वर्ष नवी मुंबईत कोणतीही करवाढ न करता नागरिकांना सर्व सेवा व सुविधा व्यवस्थित मिळत आहेत. या निर्णयाच्या यशस्वीतेबद्दल काय सांगाल?
उत्तर : गेली 25 वर्ष नवी मुंबईत करवाढ झाली नाही तरीही नागरिकांना सर्व सेवा व सुविधा चांगल्या प्रकारे मिळत आहेत हे सत्य आहे. भविष्यात शाळा आणि आरोग्य सेवा अधिक आधुनिक करण्याचा आमचा मानस आहे. परंतु, हे करत असताना पुढील 20 वर्ष नवी मुंबईत कर वाढणार नाही यासाठी आमचा प्रयत्न राहिल. पालिका क्षेत्रात वाढणारे आयटी सेंटर, रहिवासी संकुल, व्यापारी संकुल तसेच एमआयडीसी क्षेत्रात उभे राहणारे व्यावसायिक केंद्रे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर पालिकेला उपलब्ध होईल. त्याचबरोबर आयटी सेक्टरला मालमत्ता करातून दिलेली सुविधा बंद केल्यास कोट्यावधींचे उत्पन्न त्यामाध्यमातून वाढू शकते. त्यामुळे भविष्यात पुढील 20 वर्ष कोणतीही करवाढ न करता नागरिकांना दर्जेदार सेवा व सुविधा देण्याचा आमचा मानस आहे.
प्रश्न 7) शहराचा प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. सिडकोच्या भुखंड विक्रीस आपला विरोध आहे. त्याविषयी काय सांगाल?
उत्तर : नवी मुंबईचे नियोजन 20 लाख लोकसंख्येसाठी झाले आहे. आज महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या 17 लाख आहे. त्यामुळे या अगोदरच सामाजिक सेवा सुविधांचे भुखंड कमी असताना भविष्यात वाढणार्या लोकसंख्येची गरज म्हणून सिडकोच्या भुखंड विक्रि विरोधात मी विधानसभेत आवाज उठवला. त्यानंतर हा प्रकार थांबला आहे. पालिकेला हवे असलेले भुखंड आरक्षित ठेवून बाकीचे भुखंड सिडकोने विकावेत त्याला आमची हरकत नाही. जर भुखंडच नसतील तर आरोग्य, शिक्षण, क्रिडा, अशा विविध सामाजिक सुविधा कशा पुरवणार हा प्रश्न नवी मुंबईचा नागरिक म्हणून माझ्यासमोर होता. त्यामुळे याबाबत अधिवेशनात आवाज उठवून सिडकोची सुरु असलेली भुखंड विक्रि बंद करण्यास शासनास भाग पाडले. आता विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. नागरिकांनी खुल्या मनाने आपल्या सूचना द्याव्यात असे मी त्यानंा आवाहन करतो.
प्रश्न 8) भविष्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीप्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याविषयी जनतेला कसे आश्वस्त कराल?
उत्तर : स्वतःच्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई पालिका देशातील दुसरी महापालिका आहे. नवी मुंबई शहराची गरज लक्षात घेऊन धरण विकत घेण्याचा निर्णय मी घेतला. त्यावेळी अनेक आरोप झाले. पण त्याचा फायदा आता सर्वानाच होत आहे. शहराची वाढती लोकसंख्या बघुन टाटा हायड्रोपावर मधून सोडण्यात येणारे पाणी मोरबे धरणात आणण्यासाठी माझा शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. त्याचबरोबर 2030 ला शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या आसपास जाणार असल्याने त्यासाठी रायगड येथे भिरा प्रकल्पाजवळ 2000 एमएलडी क्षमतेचे धरण बांधण्याचा मानस आहे. यासाठी राज्यसरकार आणि केंद्र सरकारचे सहाय्य मिळाल्यास नवी मुंबईकरांचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल.
प्रश्न 9) नियोजित शहर असलेल्या नवी मुंबईत एकही विरंगुळा केंद्र नाही. नवी मुंबईकरांच्या मनोरंजनासाठी आपणाकडे काय योजना आहेत?
उत्तर : नवी मुंबई शहराची ओळख फ्लेमिंगो सिटी म्हणून आहे. शहराला 14 किमीचा सागरी किनारा आहे. या किनार्यालगत वॉटर स्पोर्टस, फ्लेमिंगो निरिक्षण केंद्र, बोटिंगची सुविधा सुरु करण्याचा मानस आहे. पामबीच मार्गालगत खाडीकडेला पर्यावरण संरक्षणाचे भान ठेवून तेथे नागरिकांसाठी पार्क विकसीत करण्याची ईच्छा आहे. तसेच मोरबे धरणाच्या सभोवताली पालिकेची 300 एकर जागा आहे. ती परदेशातील करमणुक करणार्या कंपनीसोबत करार करुन विदेशी दर्जाच्या मनोरंजन पार्क बनवण्याचा मानस आहे.
प्रश्न 10) नवी मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात?
उत्तर : नवी मुंबईकरांनी माझ्या कामावर विश्वास ठेवून सदैव त्यांची सेवा करण्याची संधी मला दिली याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. शहराचे हित कशात आहे याची जाणीव नवी मुंबईकरांना असल्याने यापुढेही ते मला संधी देतील. मी वर सांगितलेले प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शहरात खाजगी गुंतवणुकीतून प्रत्येक नोडमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय व्हावे अशी ईच्छा आहे. शहराच्या विकासासाठी नागरिकांनी पुढाकार घेउन चंागल्या सूचना केल्यास त्याचा आम्ही स्विकार करु.
वयाच्या 19 व्या वर्षापासून मी समाजकारणाचा वसा स्विकारला आहे. अनेक संघर्ष करुन मी इथवर पोहोचलो आहे. माझ्या यशात माझे कुटुंबिय, माझे कार्यकर्ते व ज्या ज्या पक्षाने मला समाजाची सेवा करण्याची संधी दिली त्या सर्वांचा सहभाग आहे. त्यामुळे आयुष्याच्या या पर्वात मी सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस