Breaking News
रोषणाई, फराळ, फटाके, कंदील, दिव्यांची आरास, मिठाई, रांगोळी, उटण्याचा सुंगध, देवदेवतांची पुजा, गिफ्ट्स, नवीन कपडे, नवीन वस्तू,बोनस यांचे समीकरण आणि सर्व धर्मीय लोकांचा आनंदोत्सोव, दिपोत्सव म्हणजे दिपावली.
दिव्यांचा झगमगाट, गोडधोडाचा फराळ आणि रोषणाई यामुळे रोजच्या धावपळीतून थोडीशी उसंत घेऊन आप्तजणांसोबत एकत्र येण्याचा सण म्हणजे दिवाळी. कितीही टेन्शन, मरगळ असली तरी या पाच दिवसात ती आपोआप झटकून वातावरणात नवा उत्साह, नव चैतन्य आपसूकच निर्माण होते आणि मन आनंदीत होण्यास हातभार लागतो. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाची धास्ती आहेच. पण त्याचे प्रमाण थोडे कमी झाल्याने यंदा निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी हटके करु यासाठी अनेकांनी आधीच प्लॅन करुन ठेवले आहेत. दिवाळी हटके करा मात्र कोरोनामुळे ज्यांनी आपल्या आप्तजणांना गमावले आहे, जे रुग्णालयात उपचार घेत आहेत, ज्यांनी आपला रोजगार गमावला आहे त्यांचाही विचार व्हायला हवा. आपल्या अतिउत्साहामुळे त्यांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची काळजी घेऊन जर दिवाळी साजरी केली तर नक्कीच प्रत्येकजण दिवाळीचा आनंद घेऊ शकेल. एखादी गोष्ट मनासारखी नाही मिळाली तर रुसवे फुगवे न करता आहे त्यात समाधान मानून सण आनंदात घालवा. अशावेळी श्रीमंताच्या घरातील दिवाळी डोळ्यासमोर न आणता झोपडीत राहणार्या, पदपथावर राहणार्या गरिबाची दिवाळी आठवा. त्यांच्यापटीत तुम्ही आम्ही किती सुखी आहोत हा विचार करा आणि त्यांचीही दिवाळी आनंदीत कशी करता येईल यासाठी हातभार लावा.
तसेच कोरोनाची रुग्णसंख्या थोडी कमी झाली असली तरी हयगय करुन जमणार नाही. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेऊन, कोव्हिड संबंधिचे सर्व नियम पाळून हा सण साजरा केला पाहिजे. महत्वाचे म्हणजे हाताला सॅनेटायझर लावून दिवे लावू नका किंवा कोणत्याही ज्वलनशील वस्तूला हात लावू नका. दिवाळीत कोरोनाला पुरक अशी कोणतीही कृती आपल्याकडून घडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. दिवाळी घरच्याघरी आरोग्यदायी, सर्वांना आनंद देणारी कशी करता येईल याचे प्लान करुन दिवाळीतील उत्साह वाढवा. दिपावलीच्या शुभेच्छा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस