Breaking News
1 मार्चला करंजा ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
उरण ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही करंजा ग्रामस्थांना 28 दिवसातून एकदा तासभर पाणी येत आहे. याविरोधात सात पाड्यातील ग्रामस्थ एकवटले आहेत. एकच मागणी, हवे पिण्याचे पाणी असा एल्गार करीत बुधवारी 1 मार्चला उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय रविवारी कोंढरी येथील हनुमान मंदीरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
करंजा येथील 30 हजाराच्या लोकवस्तीच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढतच चालली आहे. 15 दिवसातून एकदा तासभर येणारे पाणी 21 दिवसावरून आता 28 दिवसांवर पोहचले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासन, एमआयडीसी, लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात असंतोष पसरला आहे. त्यातच येथील अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्याचा फटका द्रोणागिरी हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना बसत आहे. उरण तालुक्यातील सर्वात मोठ्या चाणजे ग्रामपंचायतीत अनेक दशकापासून करंजा सात पाड्यात अनियमित पाणी पुरवठ्याची समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद, राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून करंजा परिसरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. असे असताना ही करंजा येथील अनियमित व अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. यामध्ये ग्रामस्थांपर्यंत पाणी पोहचत नाही. या गावांना एमआयडीसीच्या रानसई धरणातून व नवी मुंबईच्या हेटवणे धरणातून अशा दोन योजनांतून पाणी पुरवठा केला जात आहे. तरीही पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ग्रामस्थांच्या बैठकीला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai